For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता 20 कोटीसाठी मनपाची तातडीची बैठक

10:55 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता 20 कोटीसाठी मनपाची तातडीची बैठक
Advertisement

पी. बी. रोडवरील रुंदीकरण प्रकरण : 27 रोजी होणार बैठकीत चर्चा

Advertisement

बेळगाव : स्मार्ट सिटी अंतर्गत जुन्या पी. बी. रोडचे रुंदीकरण करण्यात आले. यामध्ये काही जणांची जागा घेण्यात आली. मात्र त्यांना रक्कम दिली गेली नाही. न्यायालयाने आदेश देऊनही रक्कम दिली नसल्यामुळे सदर जागा मालकांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. संबंधित जागा मालकांना महानगरपालिकेला अंदाजे 20 कोटी रुपये देणे गरजेचे आहे. त्याची तरतूद करायची असून त्यासाठी तातडीची कौन्सिल बैठक मंगळवार दि. 27 रोजी सकाळी 11.30 वाजता बोलाविण्यात आली आहे. शहरातील विविध रस्ते स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आले. हे रस्ते करताना रुंदीकरण केले. त्यासाठी अनेकांची जागा घेण्यात आली. मात्र त्यांना नुकसानभरपाईच दिली गेली नाही. एक तर दडपशाही करत जागा हिसकावण्यात आली आणि नुकसानभरपाई दिली नाही. त्यामुळे अनेक जणांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अनेकांना मोठी रक्कम देण्याचे आदेश बजावले आहेत. यामुळे महानगरपालिकेला मोठा दणका बसला आहे.

जुन्या पी. बी. रोडवरील आर. एस. क्र. 326/3, 326/5, 326/7 मधील रस्त्यासाठी जागा घेतली गेली. त्यानंतर त्या जागा मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने अंदाजे 20 कोटी रुपये संबंधित जागा मालकांना देण्याचे आदेश दिले. त्यामुळे महानगरपालिकेने याबाबत नगरविकास खाते आणि सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र सरकारने सदर रक्कम ही महानगरपालिकेनेच द्यावी असे पत्र पाठवून दिले. मात्र इतकी मोठी रक्कम देणे अशक्य असल्याने महानगरपालिका अडचणीत आली होती. महानगरपालिकेकडे पैशाची कमतरता असल्याचे कारण देत सरकारचे मुख्य कार्यदर्शी, नगरविकास खाते, कर्नाटक सरकार मंत्रालयाकडे पालिकेच्यावतीने पुन्हा पत्र पाठविण्यात आले. मात्र सरकारने सदर जागा ही मनपाने घेतली आहे. त्यामुळे ती रक्कम मनपानेच द्यावी, असे पुन्हा पत्र पाठविल्यामुळे महानगरपालिका आयुक्तांनी तातडीने बैठक घेण्याचे नियोजन केले आहे.

Advertisement

सहा महिन्यांचा दिला अवधी

सदर जमीन रस्त्यासाठी घेतल्यानंतर नुकसानभरपाई देण्यास बराच कालावधी लागला. त्यामुळे जागा मालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला होता. याचबरोबर महसूल विभागाकडेही त्यांनी पाठपुरावा केला. न्यायालयाने जागा मालकांना 9 जानेवारी 2025 पर्यंत रक्कम देण्यासाठी अवधी दिला आहे. मात्र तत्पुर्वी याबाबत कौन्सिलमध्ये निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मनपा आयुक्तांनी तातडीची बैठक बोलाविली आहे. या बैठकीमध्ये चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत महानगरपालिकेतील कौन्सिल विभागाने सर्व नगरसेवकांना तातडीने नोटीस पाठवून दिल्या आहेत.

Advertisement
Tags :

.