दोडामार्ग येथील रुग्णाला गोव्यात तातडीने रक्तदान
ऑन कॉल संस्थेसह रक्तदात्यांनी जपले रक्ताचे नाते
ओटवणे प्रतिनिधी
गोवा बांबोळी रुग्णालयात दोडामार्ग येथील विष्णू गवस यांना हृदय शस्त्रक्रीयेसाठी फ्रेश बी पॉझिटिव्ह रक्ताच्या दोन पिशव्यांची गरज असताना ऑन कॉल संस्थेच्या रक्तदात्यांनी एका कॉलवर रक्तदान करीत या रुग्णाचे प्राण वाचवले. उल्लेखनीय म्हणजे मंगेश माणगांवकर यांचे हे तब्बल बत्तीसावे रक्तदान आहे. त्यामुळे रक्तापलीकडचे नाते जपणाऱ्या ऑन कॉल संस्थेसह रक्तदात्यांचे या रुग्णाच्या नातेवाईकांनी आभार मानले.विष्णू गवस यांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या फ्रेश रक्तासाठी नातेवाईकांनी ऑन कॉल संस्थेशी संपर्क साधताच श्रीराम साईल, कारीवडे, आर्मीमॅन अजित सावंत, तुकाराम गावडे, श्रीराम साईल यांनीही नियोजन केले. त्यानंतर तात्काळ मंगेश माणगावकर आणि राहुल खरात यांनी गोवा येथे जात रक्तदान केले. त्यानंतर फ्रेश रक्ताअभावी थांबलेली गवस यांची हृदय शस्त्रक्रियां पूर्ण झाली. त्यामुळे तात्काळ रक्तपुरवठा केल्याबद्दल ऑन कॉल रक्तदाता संस्थेचे व रक्तदात्यांचे रुग्णांच्या नातेवाईकांनी आभार मानले. तसेच शिक्षिका तेजस्विता वेंगुर्लेकर आणि सचिन जाधव, कारीवडे यांनीही यासाठी रक्तदान करण्याची तयारी दर्शविली होती.
ऑन काॅल रक्तदाता संस्थेचे रक्तदाते एका कॉलवर कोणत्याही परिस्थितीत दिवसरात्र, ऐन पावसात, प्रतिकूल परिस्थितीत स्वतः पदरमोड करुन रक्तदान करण्यासाठी देवताप्रमाणे सज्ज असतात. संघटनेचे सदस्य आणि रक्तदाते अपघातग्रस्त तसेच तातडीच्या शस्त्रक्रियेवेळी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा बनताना सामाजिक भान ठेवून रक्तदान चळवळीत कार्यरत आहे. अशा असंख्य रक्तदात्यांची संस्था असून सांघिक कार्याने रक्ताची गरज पूर्ण करून रुग्णांचे प्राण वाचविले जातात. यासाठी संस्थेच्या ज्येष्ठ सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते. समाजाला अभिप्रेत असे सत्कार्य या संस्थेच्यावतीने केले जाते.