दसरा चौकात शनिवारी उर्दु कार्निव्हल
कोल्हापूर :
समाजाला उर्दु भाषेची माहिती व्हावी हा उद्देश घेऊन शनिवार 11 जानेवारीला दसरा चौकात उर्दु कार्निवल-2025 चे आयोजन केले जात आहे. यामध्ये उर्दु साहित्यासह मराठी, इंग्रजी भाषेचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांचे स्टॉल मांडण्यात येणार आहे. याच स्टॉलवर कुराण शरीफच्या छोट्या प्रतींचीही मांडणी केली जाणार आहे. राजर्षी शाहू महाराजांनी अरबी भाषेतील कुराणचे मराठी बोली भाषेत करवून घेतलेल्या अनुवादाची सत्य प्रतही कार्निव्हलमध्ये अग्रभागी असणार आहे, अशी माहिती कार्निवलचे आयोजक व मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
कार्निव्हलसाठी दसरा चौकात मोठा मंडप उभारला जाणार असल्याचे सांगून अधिक माहिती देताना आजरेकर म्हणाले, सकाळी 9 वाजता उर्दु कार्निव्हलला सुऊवात होईल. यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत अखंडपणे सुऊ राहणाऱ्या या कार्निव्हलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये नेहऊ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, अॅग्लो उर्दु हायस्कूल, डॉ. झाकीर हुसेन उर्दु मराठी शाळा, हाजी शाबाज आमीनखान जमादार उर्दु मराठी शाळा, हाजी गफूर वंटमुरे उर्दु मराठी शाळा, मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु हायस्कूल या शाळांमधील मुलांकडून देशभक्तीपर गीतांवर आधारीत कार्यक्रम सादर करण्यात येतील. उर्दु मुशायरा हा शेरो-शायरीवर आधारीत कार्यक्रमही आयोजित केला जाणार आहे. एकंदरीत जनमाणसांना कार्निवलमध्ये मांडण्यात येणाऱ्या स्टॉलवऊन आवडीच्या पुस्तकांची खरेदी करत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटत खाद्य पदार्थांवरही ताव मारता येणार आहे. इ. स. पूर्व काळात चलनात राहिलेल्या नाण्यांचे प्रदर्शन तर कार्निव्हलचे खास आकर्षण असणार आहे.
आजरेकर पुढे म्हणाले की, दुपारी 4 वाजता खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली कार्निव्हलचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात येईल. या समारंभासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, इद्रीस नायकवडी व माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असेही आजरेकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मोहामेडन सोसायटीचे प्रशासक कारद मलबारी, संचालक रफिक शेख, लियाकत मुजावर, अबु तकीलदार, राज महात, समीर मुजावर, ऊक्साना पटेल, महंमद इक्बाल ताशिलदार, शकील अहंमद आदी उपस्थित होते.