कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

UPSC Result 2025: ‘तू मग UPSC चा अभ्यास करशील?, बापाने विचारलं अन् लेकानं करुन दाखवलं!

12:38 PM Apr 24, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

UPSC मध्ये चिपळूणच्या सिद्धार्थ जैनने मिळवली 397 वी रँक, तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी

Advertisement

By : राजेश जाधव

Advertisement

चिपळूण : शहरात गेली 38 वर्षे कापड व्यवसाय करणाऱ्या पारसमल जैन यांचा मुलगा सिद्धार्थ जैन याने युपीएससीत 397 वी रँक मिळवून मोठे यश मिळवले आहे. त्याच्यामुळे चिपळूणचे नाव उंचावले असून शहरवासियांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्याने यशाला गवसणी घातली आहे. वालोपे येथील ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकताना त्याने केजीपासून दहावीपर्यंत कधीही पहिला क्रमांक सोडला नाही.

लहानपणापासून हुशार असलेल्या सिद्धार्थ याचे प्राथमिक शिक्षण ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले आहे. अकरावी, बारावीचे शिक्षण डिबीजे महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून झाले. यानंतर त्याने मुंबई येथील इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटीतून मरीन इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. येथे त्याला सलग तीन वर्षे स्कॉलरशिप मिळाली. मात्र या क्षेत्रात कार्यरत असताना त्याला काही वाईट अनुभव आले.

त्यामुळे तो चिपळुणात परत आला. हे वाईट अनुभव कुटुंबाकडे कथन केल्यानंतर वडील पारसमल यांनी ‘तू मग युपीएससीचा अभ्यास करशील का? अशी विचारणा केली. त्याला लगेचच होकार देत तो 2021 साली अभ्यासासाठी दिल्लीतील जैन इंटरनॅशनल होस्टेलमध्ये गेला. अभ्यास सुरू झाल्यानंतर पहिला प्रयत्नात त्याला अपयश आले. तरीही न खचता त्याने अभ्यास सुरुच ठेवला. दुसऱ्या प्रयत्नात तो मुलाखतीपर्यंत गेला. तरीही न खचता रात्रंदिवस अभ्यास करून त्याने तिसऱ्या प्रयत्नात 397 वी रँक मिळवून आपले व कुंटुबाचे स्वप्न साकार केले आहे.

शिक्षणासाठी घरातून प्रोत्साहन

सिद्धार्थचे वडील पारसमल यांचे शिक्षण अकरावी, आई निर्मला यांचे शिक्षण दहावी पर्यंत झाले आहे. तरीही आपली मुले उच्चशिक्षित झाली पाहिजेत या ध्येयातून त्यांनी मुलांना कायमच शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. यातूनच त्यांचा मोठा मुलगा हितेश हा 'सीए' झाला. तो सध्या मुंबईत आहे. तर मुलगी साक्षी ही 'वकील' असून तीही मुंबईतच आहे. आता 27 वर्षीय सिद्धेश त्यांच्याही एक पाऊल पुढे गेला आहे. त्यामुळे आई, वडील कमी शिकलेले असले तरी मुलांनी मात्र शिक्षणात मोठे शिखर गाठले आहे. हितेश याची पत्नी खुशबू हिने पॉलिटिकल सायन्सची पदवी घेतली आहे.

वडीलांचा 38 वर्षे कापड व्यवसाय

जैन कुटुंब शहरातील खेंड येथील स्वरविहार संकुलात राहण्यास आहेत. सिद्धार्थ याचे वडील पारसमल हे गेल्या 38 वर्षापासून कापड व्यवसायात आहेत. त्यांची शहरात महाराणी कलेक्शन लेडीजवेअर, वर्धमान टेक्सटाईल, पारसदेव साडी सेंटर अशी तीन दुकाने असून त्यांचा कारभार सांभाळण्यासाठी त्यांना पत्नी, भाऊ व अन्य नातेवाईक मदत करीत आहेत. कापड व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतानाच त्यांनी मुलांना उच्चशिक्षित केल्याने त्यांचेही कौतुक होत आहे.

सिद्धार्थ 27 ला येणार चिपळुणात

सिद्धार्थ हा सध्या दिल्ली येथेच असून तो 27 रोजी चिपळुणात येणार आहे. त्यामुळे त्याचा मित्र परिवार त्याच्या स्वागताची जय्यत तयारी करू लागला आहे.

मुलांचा अभिमान वाटतो

"मी कापड व्यावसायिक असल्याने मुलांच्या शिक्षणात तितकेसे लक्ष देता आले नाही. मात्र त्यांनी आपले ध्येय ठरवून मार्गदर्शक शिक्षकांच्या माध्यमातून यश मिळवून जैन कुंटुबाचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे मुलांचा अभिमान वाटतो."

- पारसमल जैन, सिध्दार्थचे वडील

ध्येय निश्चित करावे!

"शिक्षण घेत असताना आपली शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. त्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी जास्तीतजास्त अभ्यास करण्याची गरज असून शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सर्वांचे मार्गदर्शन घेतल्यास यश मिळवणे शक्य होते."

सिद्धार्थ जैन

Advertisement
Tags :
#chiplun news#IAS#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#UPSCexamresult#UPSCRankupsc result 2025
Next Article