For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यशवंतराय गौडा यांच्या राजीनाम्यावरून गदारोळ

06:34 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
यशवंतराय गौडा यांच्या राजीनाम्यावरून गदारोळ
Advertisement

विधानसभेत सरकारला घेरण्याचा भाजपचा प्रयत्न : सत्ताधारी-विरोधी आमदारांत शाब्दिक चकमक

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

आपल्या मतदारसंघाला दुष्काळग्रस्त यादीत स्थान न दिल्याने विजापूर जिल्ह्यातील इंडीचे आमदार यशवंतराय गौडा पाटील यांनी बुधवारी आमदारपदाचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेस गोटात खळबळ माजली. मात्र, यशवंतराय गौडा यांच्या राजीनाम्याचा विषय बुधवारी विधानसभेत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. हाच मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्ष भाजपच्या आमदारांनी विधानसभेत सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला तसेच विधानसभा अध्यक्षांकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

Advertisement

सोमवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनातील पहिले दोन दिवस कस्तुरीरंगन अहवालावरील चर्चेसाठी राखून ठेवण्यात आले होते. बुधवारी  दुष्काळावर संपूर्ण दिवस चर्चा होणार होती. त्यानुसार राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवर चर्चा सुरू असताना, विधानसभेत विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी आमदार यशवंतरायगौडा पाटील यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला. राजीनामा पत्राची प्रत दाखवत त्यांनी काँग्रेस आमदाराने राजीनामा दिल्याचा उल्लेख केला. “या सरकारला लाज वाटली पाहिजे; दुष्काळ व्यवस्थापनात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहे,” अशी टीका केली. त्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी ‘धिक्कार असो, धिक्कार असो’ अशी घोषणाबाजी केली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

आरोग्य मंत्री यु. टी. खादर आणि नरेंद्र स्वामी यांनी हा पक्षांतर्गत मुद्दा आहे असल्याचे सांगत आमचा पक्ष या राजीनाम्याबाबत निर्णय घेईल. विरोधी पक्षाला याची चिंता कशाला, असा प्रश्न उपस्थित करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा विरोधी पक्षाच्या आमदारांनी यशवंतरा गौडा यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून सरकारवर शाब्दिक हल्ला सुरूच ठेवला.

यापेक्षा मोठा अपमान असूच शकत नाही : व्ही. सुनीलकुमार

यामुळे सभागृहत गोंधळ माजला. गोंधळातच भाजपचे आमदार व्ही. सुनीलकुमार यांनी बोलताना, अधिवेशन सुरू असतानाच या राजीनाम्याबाबत सभागृहाला माहिती दिली जावी, अशी विनंती सभाध्यक्षांना केली. अधिवेशन सुरू असताना राजीनामा होणे ही सरकारसाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे. यापेक्षा मोठा अपमान असूच शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार : परमेश्वर

उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विरोधी पक्षाच्या टीकेला प्रत्युत्तर देताना या परिस्थितीसाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचे म्हटले, ज्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांत पुन्हा एकदा खडाजंगी झाली. दरम्यान, आपले म्हणणे मांडताना उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने निश्चित केलेल्या काही निकषांमुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत काही तालुक्यांचा समावेश करता येत नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनही केंद्र सरकार नियमावलीत कोणतीही शिथिलता देत नाही.

दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी : आर. अशोक

यावेळी हस्तक्षेप करत विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी, हे नियम खुद्द संपुआ सरकारनेच तयार केले होते, अशी आठवण करून दिली. परिणामी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली. विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी उभे राहून सभाध्यक्षांना विनंती केली की, आमदारांनी राजीनामा दिला आहे की नाही, हे स्पष्ट करावे. एका बाजूला अर्थ खाते सरकार दिवाळखोरीत निघाल्याचे सांगत असतानाच, दुसऱ्या बाजूला सरकार दुष्काळाची परिस्थिती हाताळण्यातही अपयशी ठरत आहे, अशी टीका केली.

सभाध्यक्षांच्या स्पष्टीकरणानंतर चर्चेला पूर्णविराम

यावेळी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री बोलत असताना वारंवार होणारे असे व्यत्यय अयोग्य आहेत, असे सभाध्यक्ष जी. एस. पाटील यांनी निदर्शनास आणून देऊनही आमदारांमधील शाब्दिक चकमक सुरूच राहिली. अखेरीस, सभाध्यक्षांनी, संबंधित राजीनामा विहित नियमांचे पालन करणारा नसल्यामुळे तो फेटाळण्यात आला आहे, असे जाहीर केले. त्यानंतर या विषयावरील चर्चेला पूर्णविराम मिळाला.

राजीनामा का दिला ?

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून विजापूर जिल्ह्यातील इंडी आणि चडचण तालुके वगळण्यात आल्याने नाराजी व्यक्त करत इंडीचे काँग्रेस आमदार यशवंतराय गौडा पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. राज्य सरकारकडे वारंवार विनंती करूनही इंडी आणि चडचण तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. आमच्या शब्दांना, भावनेला किंमतच नसल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात प्रभावी आणि दबावतंत्राचा वापर करणाऱ्यांनाच महत्त्व दिले जाते, माझ्यासारख्या सौम्य स्वभावाच्या व्यक्तींच्या कामाची दखल घेतली जात नाही. परिणामी, माझ्या मतदारसंघातील लोकांच्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यामुळे मी आमदारपदाचा राजीनामा दिला असल्याचे यशवंतराय गौडा पाटील यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या काळजीपोटी घेतलेला निर्णय

यशवंतराय गौडा पाटील यांचा राजीनामा देण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या  काळजीपोटी घेतला गेला आहे. विरोधी पक्ष उतावळेपणाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. काहीतरी मोठी गोष्ट उघडकीस आली आहे अशा अविर्भावात ते आरडाओरड करत आहेत. सर्व आमदारांना आपापल्या मतदारसंघातील परिस्थितीवर चर्चा करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने अधिवेशन बोलावण्यात आणे आहे.

-डी. के. शिवकुमार, मुख्यमंत्री

Advertisement
Tags :

.