काश्मीर विधानसभेत ‘370’वरून गदारोळ
पीडीपी आमदारांनी मांडला 370 हटवण्याविरोधात प्रस्ताव, भाजपचा विरोध,
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस सोमवारी गदारोळात सुरू झाला. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आमदार वाहिद पारा यांनी कलम 370 रद्द करण्याच्या विरोधात प्रस्ताव मांडल्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. या प्रस्तावाच्या निषेधार्थ भाजप आमदारांनी सभागृहात आवाज उठवला. या गोंधळावेळी काही आमदारही वेलमध्ये पोहोचल्याने कामकाजावर परिणाम झाला.
कलम 370 वरून सभागृहात गोंधळ निर्माण झाल्यानंतर सभापती रहीम अब्दुल राथेर यांनी असा कोणताही प्रस्ताव अद्याप स्वीकारलेला नसल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही यावर स्पष्टीकरण देताना ‘370 वर सभागृहात चर्चा कशी होईल? हा निर्णय कोणत्याही एका सदस्याकडून घेतला जाणार नाही. आज आणलेल्या प्रस्तावाला महत्त्व नाही. यामागे काही हेतू असेल तर पीडीपीच्या आमदारांनी आधी आमच्याशी चर्चा केली असती. मात्र, केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेला निर्णय जम्मू-काश्मीरमधील जनतेला मान्य नाही हे वास्तव आहे.’ असे स्पष्टीकरण दिल्याने संभ्रमावस्था दूर झाली.
अब्दुल राथर यांची सभापतीपदी निवड
सभागृहात गदारोळ होण्यापूर्वी नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ आमदार अब्दुल रहीम राथर यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. प्रोटेम स्पीकर मुबारक गुल यांनी राथर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तोही मंजूर झाला. राथर हे सातव्यांदा आमदार झाले आहेत. तसेच जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील पहिल्या विधानसभेतील ते सर्वात वयस्कर आमदार आहेत. रविवारी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घेतलेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत राथर यांना सभापती बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीला काँग्रेस, माकप, आम आदमी पक्ष आणि अपक्ष आमदारांनी हजेरी लावली होती.
उपसभापतीपद भाजपला शक्य
अब्दुल्ला सरकार उपसभापतीपद भाजपला देऊ शकते. मात्र, अद्याप यासंबंधीची कोणतीही माहिती सरकारकडून भाजपला देण्यात आलेली नाही. यासंबंधी आज-उद्या निर्णय होऊ शकतो. रविवारी झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत सुनील शर्मा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते असतील. तर सत शर्मा यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे.
दहशतवादी हल्ल्यांबाबत गदारोळ होण्याची शक्यता
ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात 6 दहशतवादी हल्ले झाले आहेत. लष्कर-ए-तोयबा कमांडरसह सहा दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच तीन जवानही हुतात्मा झाले. याशिवाय 8 परप्रांतीय मजुरांचाही मृत्यू झाला आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दहशतवाद्यांनी परप्रांतियांना लक्ष्य करून अनेक हल्ले केले आहेत.