‘गृहलक्ष्मी’वरून विधानसभेत गदारोळ
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर-भाजप आमदारांत शाब्दिक चकमक
बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेवरून मंगळवारी सायंकाळी विधानसभेत काँग्रेस-भाजपमध्ये खडाजंगी झाली. गृहलक्ष्मी योजनेची रक्कम विविध जिल्ह्यात वेळेत मिळत नाही. याकडे भाजपचे महेश टेंगिनकाई यांनी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे लक्ष वेधले. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. गृहलक्ष्मी योजनेची रक्कम गेल्या तीन महिन्यात लाभार्थी महिलांना पोहोचली नाही. इतकेच नाही तर यावर्षीच्या फेब्रुवारी व मार्चची रक्कमही मिळालेली नाही. ती का दिली नाही? असा प्रश्न भाजप आमदार महेश टेंगिनकाई यांनी उपस्थित केला. आपण ऑगस्टपर्यंतचे सर्व हप्ते थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले आहेत, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.
प्रश्न-प्रतिप्रश्न
ऑगस्टपर्यंतची रक्कम जमा झाली आहे, तर फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांची का जमा झाली नाही? असा प्रश्न महेश टेंगिनकाई यांनी उपस्थित केला. त्यावेळी संतप्त झालेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे काय झाले? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. त्यामुळे भाजपचे आमदार संतप्त झाले. आम्ही कर्नाटकाच्या सभागृहात आहोत. महाराष्ट्राचा विषय कुठून आला? असा प्रश्न त्यांनी विचारला.
1.24 कोटी गृहिणींना 54 हजार कोटी रु.
भाजपचे सुनीलकुमार यांच्यासह इतर आमदारांनीही आक्षेप घेतला. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी गृहलक्ष्मी योजना राबविण्यात येत आहे. कर्नाटकातील ही योजना इतर राज्यांनीही ‘मॉडेल’ म्हणून वापर केला आहे. आतापर्यंत राज्यातील 1 कोटी 24 लाख गृहिणींना 54 हजार कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. 23 हप्त्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे. कोणत्याही मध्यस्थांशिवाय योजनेची रक्कम थेट महिलांच्या खात्यात जमा केली जात आहे. सुरुवातीला या योजनेसंबंधी तुम्हाला कळवळा नव्हता. आता मध्येच कुठून प्रेम उफाळून आले? इतर राज्यांविषयी बोलू नये म्हणून मी गप्प होते. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचे काय झाले? असा संतप्त सवाल लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित केला.