For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मडगाव पालिका बैठकीत गदारोळ

01:07 PM Oct 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मडगाव पालिका बैठकीत गदारोळ
Advertisement

घोटाळ्यातील रकमेची बाकी असलेली वसुली : शिवजयंती निधीचा हिशेब, थकलेली बिले, कामचुकार कर्मचाऱ्यांसह अनेक विषय गाजले

Advertisement

मडगाव : मडगाव पालिकेची मंगळवारी झालेली बैठक फेस्ताच्या फेरीतून गोळा केलेल्या सोपो रकमेच्या घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप असलेला कारकून फरारी असल्याने रकमेची वसुली कशी काय होणार, शिवजयंती साजरी करण्यासाठी सरकारकडून मिळालेल्या निधीचा हिशेब आणि एकाच नोंदणी क्रमांकाने दोन जन्मदाखले देण्याचा प्रकार घडल्याचा आरोप तसेच कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठीची पडून असलेली बिले यावरून भरपूर गाजली. यावेळी अनेकदा गदारोळ माजून नगराध्यक्ष व नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली.

शिवजयंतीला सरकारकडून मिळालेला 5 लाख ऊपयांच्या निधी घेण्यासाठी आपली सही अध्यक्ष या नात्याने घेण्यात आली. मात्र खर्चाची बिले फेडताना नगराध्यक्षांनी धनादेशांवर आपली सही घेतली नाही व एकंदर पाच लाखांचा हिशेब आपल्या नजरेसमोर आणला गेलेला नाही, असा दावा नगरसेवक सिद्धांत गडेकर यांनी नगरसेवक रवींद्र नाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर केला. यावेळी नगराध्यक्ष शिरोडकर आणि सिद्धांत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. नगराध्यक्षांनी सुमारे साडेतीन लाखांचा निधी अजूनही शिल्लक असल्याचे नजरेस आणून दिले. यावेळी रवींद्र नाईक यांनी सदर निधी पालिकेमार्फत शिवजयंती साजरी करण्यासाठी वापरात आणावा, असे सूचित केले.

Advertisement

फेस्त फेरी सोपो घोटाळाप्रकरणी मडगाव पालिकेचा कारकून योगेश शेटकर याच्याकडून अजूनही 17 लाखांपैकी 14 लाख येणे बाकी आहे. ते कसे वसूल करणार ? कारण तो कामावर येत नाही. पोलिसांना तो सापडत नाही. मग वसुली कशी होणार, असा सवाल नगरसेवक रवींद्र उर्फ राजू नाईक यांनी उपस्थित केला. कित्येक मोठे गुन्हेगार पोलीस पकडू शकतात, मात्र योगेश कसा सापडत नाही, असा सवाल नगरसेवक सगुण उर्फ दादा नाईक यांनी केला. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन पालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी स्पष्ट केले. नगरसेवक महेश आमोणकर यांनी शेटकर यापूर्वीच्या फेस्ताच्या फेरीच्या बाबतीतही घोटाळा करणार होता, असा दावा केला.

डाटा ऑपरेटर्सवर कारवाईचे आश्वासन

सोपो लिलावासाठी तीन वेळा निविदा काढली, तरी बोलीदार मिळाला नाही. त्यामुळे आता रक्कम पुन्हा 69 लाख रुपयांवर आणण्याचे म्हणजे पूर्वीच्या बोलीच्या 10 टक्के रक्कम कमी करण्याचे तसेच अटींमध्ये बरीच शिथीलता आणण्याचे ठरविण्यात  आले. नगरसेविका पूजा नाईक यांनी डाटा ऑपरेटर्स कामावर उशिरा येत असल्याचा दावा केला. आपण बायोमेट्रिक हजेरी मागितली असता आपणास काहीच माहिती मिळाली नाही. कारण बायोमेट्रिक हजेरीपट काम करत नाही. या डाटा ऑपरेटर्सचे वेतन वाढविण्यात आले आहे, तरीही कामचुकारपणा करणाऱ्यांवर आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी नाईक यांनी केली असता नगराध्यक्षांनी आवश्यक कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे गणवेष न घालणाऱ्यांवर सोमवारपासून आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

अकाउंटन्टविना कामे खोळंबली

सध्या मडगाव पालिकेचा अकाउंटन्ट रजेवर आहे. ज्या वास्कोतील अकाउंटन्टला सध्या ताबा देण्यात आला आहे त्याने आठवड्यात दोन वेळा उपस्थिती लावणे गरजेचे असताना तो उपस्थित राहत नसल्याने कामे खोळंबून पडत आहेत, असा दावा नगरसेवक सगुण नाईक यांनी केला. त्यामुळे कर अधिकाऱ्यांवर अतिरिक्त  भार पडत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

पालिका सुशोभिकरण आराखडा दिवाळीपूर्वी

जुलै, 2021 मध्ये आपण नगराध्यक्ष असताना पालिका इमारतीची रंगरंगोटी करण्यासाठी ठराव घेण्यात आला होता. आता पुन्हा ठराव घेण्याची गरज नसल्याचा दावा माजी नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांनी या विषयावरील चर्चेदरम्यान केला. नगरसेवक सगुण नाईक यांनी दिंडी उत्सवापूर्वी ही रंगरंगोटी पूर्ण करण्याची मागणी केली. पूर्वीच्या ठरावानुसार इमारत सुशोभिकरणासाठी सरकारने कन्सल्टंट नियुक्त केला आहे. त्यांनी अन्य काही पालिका इमारतींचेही सुशोभिकरण करण्याचा आराखडा तयार केला आहे. मडगाव पालिकेचा आराखडा दिवाळीनंतर मिळेल. त्यात पालिका इमारत संपूर्णपणे वातानुकूलित करण्याची आणि दिव्यांगांसाठी लिफ्ट बसविण्याची आपण सूचना केली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष शिरोडकर यांनी दिली. शेवटी पूर्वीच्याच लाल रंगाने पालिका इमारत रंगविण्यात यावी, असे ठरविण्यात आले.

गणपतीपूजन सभागृहावर रेस्टॉरंटची सूचना

मडगाव पालिका उद्यानातील गणपतीपूजन सभागृहाचे सुशोभिकरण करणे व तेथे कॉफी स्टॉल उभारण्याचे प्रस्ताव चर्चेला आले असता तेथे रेस्टॉरंट करण्याची सूचना नगरसेवक सगुण नाईक यांनी केली. खाली गणपतीपूजन सभागृह आणि वर रेस्टॉरंट वा कॉफी स्टॉल उभारण्याचे ठरविण्यात आले. मात्र कामिलो बार्रेटो यांनी त्यास आपला आक्षेप असल्याचे सांगितले. नगरसेवक फ्रान्सिस जोनास यांनी तांत्रिक बाबींवर बोट ठेवले. यावेळी कोणतीही तांत्रिक अडचण असल्यास हा प्रस्ताव पुढे नेला जाणार नसल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. ही जागा भेट दिलेली जमीन असल्याने त्याबाबत कायदेशीर बाबी लक्षात घेऊन पुढची पावले उचलावीत, अशी सूचना नगरसेवक घनश्याम शिरोडकर यांनी केली. नगरसेवक महेश आमोणकर यांनी तेथे व्यायाम करण्यासाठी जिमची सोय करण्याची सूचना केली.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 5 वर्षे देखभालीच्या अटीसह निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका अभियंता दीपक फळदेसाई यांनी दिली. पोलिसांकडे त्याची फुटेज राहणार असून पोलिसांनी दाखविलेल्या 38 ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. याशिवाय एम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशनच्या स्थापनेसाठी ‘एनओसी’ देणे, सोनसडा येथील ‘एमएसडब्ल्यू शेड’च्या पूर्वेला गटार, रेन वॉटर हार्वेस्टिंग टाकी, रॅम्प इत्यादीसह काँक्रीट रस्ता बांधणे, 14 व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून प्लास्टिक कचरा बांधण्यासाठी 12 मि. मी. रोलच्या पॅकिंग पट्ट्या पुरविणे आणि सध्याच्या पालिका मार्केट इमारतीवर शेड बांधणे असे निर्णय चर्चेअंती घेण्यात आले.

कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाच्या बिलांवरुन गदारोळ

कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी नियुक्त एजन्सीची 30 महिन्यांची प्रति महिना 60 हजार रु. अशा प्रकारे मिळून 18 लाख रुपयांची बिले पडून असल्यावरून बैठकीत जोरदार गदारोळ झाला. गोवा फॉरवर्डचे लिंडन पेरेरा आणि नगराध्यक्ष शिरोडकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. नगराध्यक्षांनी ही बिले पेरेरा यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळापासून पडून असल्याने ते तेवढेच जबाबदार असल्याचे सांगितले. यावेळी सेनिटरी निरीक्षक विराज आरबेकर यांनी मध्यंतरीच्या काळात बिले कनिष्ठ अभियंते प्रमाणित करत होते, असे नजरेस आणून दिले आणि या एजन्सीच्या संपलेल्या कराराचे नूतनीकरण झालेले नसल्याने काही काळातील बिले प्रमाणित करणे शक्य नसल्याचे कारण पुढे केले.

एकाच नोंदणी क्रमांकाने दोन जन्मदाखले

नगरसेवक सगुण नाईक यांनी पालिकेतून दोन जन्मनोंदणीना एकच समान नोंदणी क्रमांक देण्यात आला असून हा मोठा घोळ असल्याचा दावा केला. या प्रकरणी जोरदार चर्चा झाली. शेवटी मुख्याधिकाऱ्यांसमोर दोन्ही जन्मदाखला धारकांना बोलवून सुनावणी घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी जन्मनोंदणी विभागातील अन्य काही घोळही नाईक यांनी मंडळासमोर मांडले.

Advertisement
Tags :

.