जपानमध्ये पुरुषांच्या पायांवरील केसांवरून गदारोळ
शॉर्ट्स परिधान केल्याने सुरु झाली नवी चर्चा
जपानमध्ये सध्या एक असे प्रकरण चर्चेत आहे, जे कळल्यावर तुम्हीच चकित व्हाल. येथे कुठल्याही मोठ्या कायद्यावरून किंवा नव्या तंत्रज्ञानावरून वाद नाही, तर पुरुषांच्या पायांवरील केसांवरून चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर लोक याला ‘लेग हेयर हॅरेसमेंट’ म्हणजेच पायांवरील केसांमुळे होणारा त्रास म्हणत आहेत. हे प्रकरण आता पूर्ण जगात चर्चेचा विषय ठरले आहे. जपानमध्ये सध्या उन्हाळा सुरू असून अनेक शहरांमध्ये तापमान 35-40 अंशांपर्यंत पोहोचत आहे. अशास्थितीत लोकांना उष्णतेपासून दिलासा देणे आणि एसीचा कमी वापर करण्यासाठी टोकियो प्रशासनाने कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये हलके अन् आरामदायी कपडे परिधान करण्याचा सल्ला दिला आहे.
यानुसार पुरुष कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा ऑफिसमध्ये शॉर्ट्स परिधान करून येण्याची अनुमती देण्यात आली आहे. हे पाऊल कर्मचाऱ्यांना उकाड्यापासून वाचविणे आणि विजेची बचत करण्यासाठी उचलण्यात आले आहे. हा पुढाकार जपानमध्ये दीर्घकाळापासून चालत असलेल्या ‘कूल बिज’ अभियानाचा हिस्सा आहे.
वाद कसा सुरू झाला?
पुरुष शॉर्ट्स परिधान करून येऊ लागताच सोशल मीडियावर काही महिलांनी स्वत:ची नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. ऑफिसमध्ये पुरुषांच्या पायांवरील केस पाहून आम्हाला असहज वाटू लागते असे त्यांचे सांगणे आहे. तर काही महिलांनी चेष्टेच्या सुरात याला ‘सुनेहारा’ नाव दिले. याचा अर्थ ‘लेग हेयर हॅरेसमेंट’ आहे. हा काही कायदेशीर गुन्हा नाही, हा केवळ सोशल मीडियावर वापरण्यात येणारा एक शब्द आहे, जो आता चर्चेचा विषय ठरला आहे.
महिलांची तक्रार
आमच्यासाठी आजही ऑफिसमध्ये ड्रेसकोड अत्यंत कठोर आहे. अनेक ठिकाणी आम्हाला स्टॉकिंग्स किंवा टाइट्स परिधान करावे लागतात. प्रोफेशन दिसण्यासाठी मेकअप आणि ग्रूमिंगवर लक्ष द्यावे लागते. परंतु पुरुषांना आता शॉर्ट्स परिधान करण्याची सूट मिळाली असल्याचे अनेक महिलांचे सांगणे आहे. जर पुरुष आरामदायी कपडे परिधान करू शकतात, मग महिलांसाठी देखील ड्रेसकोडमध्ये अशीच सूट मिळावी, असे काही महिलांचे म्हणणे आहे. नियम सर्वांसाठी समान असावेत असे त्यांचे मानणे आहे.
या मुद्द्यावर एक सर्वेक्षणही करण्यात आले. सुमारे 800 लोकांचे मत जाणून घेण्यात आले. 53.5 टक्के लोकांनीऑफिसमध्ये पुरुषांनी शॉर्ट्स परिधान करू नयेत, असे म्हटले. तर 46.5 टक्के लोकांनी याचे समर्थन पेले. म्हणजेच लोकांचे मत जवळपास समान विभागले गेलेले आहे. उन्हाळ्यात आराम सर्वात महत्त्वाचा असल्याचे काही लोकांचे मानणे आहे. तर ऑफिसमध्ये प्रोफेशनल लुकही कायम ठेवला जावा, असे काहींचे सांगणे आहे.
पुरुषांची नवी पद्धत
या चर्चेनंतर जपानमध्ये काही पुरुषांनी नवा मार्ग अवलंबिला आहे. अनेक लोक हेयर रिमूव्हल करवू लागले आहेत, जेणेकरून शॉर्ट्स परिधान केले तर पायांवरील केस दिसू नयेत आणि कुणाचा आक्षेप असू नये. याला काही लोक ऑफिस एटिकेट म्हणजेच वर्क कल्चरचा हिस्सा मानत आहेत. प्रत्यक्षात हा वाद केवळ पायांवरील केसांचा नाही, ऑफिसमध्ये ड्रेसकोड कसा असावा यावर ही चर्चा आहे. पुरुष आणि महिलांसाठी नियम वेगवेगळे असावेत का? वाढती उष्णता पाहता जुने नियम बदलावेत का? प्रोफेशनल दिसण्याचा अर्थ आजही तोच आहे जो अनेक वर्षापूर्वी होता? याचमुळे हे प्रकरण जपानमधून आता जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे.