For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘वंदे मातरम’वरून दोन्ही सभागृहांत हंगामा

06:46 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘वंदे मातरम’वरून दोन्ही सभागृहांत हंगामा
Advertisement

सत्ताधाऱ्यांनी गायिली दोन कडवी; भाजप आमदारांकडून पूर्ण गायन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर :

सोमवारपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या प्रारंभीच ‘वंदे मातरम’ गायनावरून सत्ताधारी-विरोधकांत वाद निर्माण झाला. अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभा आणि विधानपरिषदेत ‘वंदे मातरम’ची दोन कडवी म्हणून झाल्यानंतर सभाध्यक्षांनी पुढील कामकाज हाती घेतले. मात्र, विरोधी पक्ष भाजपच्या आमदारांनी सरकारच्या भूमिकेला आक्षेप घेत वंदे मातरम गीत पूर्ण गायिले. या गीतावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाने आपली भूमिका कायम ठेवली. त्यामुळे सभागृहांत गदारोळ माजला.

Advertisement

कस्तुरीरंगन अहवाल आणि राज्यातील दुष्काळी परिस्थिती या दोन मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारपासून तीन दिवसांचे विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले. सोमवारी सकाळी विधानसभेचे अधिवेशन ‘वंदे मातरम’ने सुरू करण्यात आले. गीताची दोन कडवी संपताच विधानसभा अध्यक्षांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात सुरुवात केली. तेव्हा सत्ताधारी पक्षाचे आमदारही त्यात सहभागी झाले.

मात्र, विरोधी पक्षाच्या आमदारांनी वंदे मातरमचे संपूर्ण गायन सुरूच ठेवले. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यापूर्वी वंदे मातरमचे पूर्ण गायन केले. त्यानंतर त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.

दरम्यान, सभाध्यक्षांनी दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडून कामकाज सुरू ठेवले होते. त्यामुळे ‘वंदे मातरम’वरून सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपच्या आमदारांमधील परस्परविरोधी भूमिका स्पष्ट झाली.

विधानपरिषदेतही गोंधळ

विधानपरिषदेत प्रारंभी वंदे मातरम गायनाच्या मुद्द्यारून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला. सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम गीताच्या पहिली दोन कडवी गायनाच्या राज्य सरकारच्या निर्णयाला भाजपच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत संताप व्यक्त केला. काँग्रेसच्या सदस्यांनी वंदे मातरमची दोन कडवी म्हटली. त्यावर आक्षेप घेत भाजपच्या सदस्यांनी वंदे मातरम पूर्ण म्हटले. त्यानंतर सभापतींनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.

सभागृहात उपस्थित मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांनी, राज्य सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम गीताची फक्त दोन कडवी गायनाचा निर्णय सरकारने घेतला आहे. आमच्या सरकारच्या कार्यक्रमांमध्ये दोन कडवी गायिली जातील. पंतप्रधान किंवा राष्ट्रपती सहभागी होणाऱ्या कार्यक्रमांत वंदे मातरम पूर्णपणे गायिले जाईल, असे सांगितले.

मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांच्या या स्पष्टीकरणावर भाजपच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत घोषणाबाजी सुरू केली. भाजपचे सदस्य रवीकुमार म्हणाले, यापूर्वी सभागृहात वंदे मातरम पूर्ण म्हटले जात होते. आता दोनच कडव्यांपुरते का मर्यादित करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी सत्ताधारी व विरोधी सदस्यांत शाब्दिक चकमक घडली.

काँग्रेसचे सदस्य बी. के. हरिप्रसाद म्हणाले, या सभागृहात यापूर्वी वंदे मातरमची दोनच कडवी गायिली जात होती. भाजपचे सभापती आल्यानंतर पूर्ण म्हणण्यास प्रारंभ झाला. दोनच कडवी का गायिली जावी, याबाबत सभागृहात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर भाजपच्या सदस्यांनी विरोध व्यक्त केला. हे काँग्रेसचे कार्यालय नव्हे; गीत पूर्णपणे का गायिले जाऊ नये, असा प्रश्न उपस्थित केला.

यावेळी सभापतींच्या अधिकारावरून सत्ताधारी व विरोधकांत वादावादी सुरू झाली. यावेळी मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांनी आपल्या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण देईन असे सांगितले. मात्र, भाजपच्या सदस्यांनी तुम्ही नको; सभापतींनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली.

यावेळी सी. टी. रवी यांनी सभापतीचे आसन संवैधानिक आहे की काँग्रेसचे? असा प्रश्न केला. त्यानंतर भाजपच्या इतर सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतरही सभागृहात गोंधळ सुरूच राहिला.

Advertisement
Tags :

.