For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकऱ्यांच्या मुद्यावर संसदेत गदारोळ सुरूच

06:39 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेतकऱ्यांच्या मुद्यावर संसदेत गदारोळ सुरूच
Advertisement

एमएसपी’वर कायदा करण्याची विरोधकांची मागणी : कृषिमंत्र्यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अर्थसंकल्प आणि शेतकऱ्यांच्या मुद्यावरून शुक्रवारी पुन्हा एकदा संसदेत जोरदार गदारोळ झाला. सपाचे खासदार रामजीलाल सुमन यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करत सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या सूचना आजतागायत लागू झाल्या नसल्याचे सांगितले. सपा खासदाराच्या वक्तव्यावर कृषिमंत्री शिवराज सिंह यांनी प्रतिक्रिया देताना शेतकरी आमच्यासाठी देवासमान असून त्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू, असे आश्वस्त केले. तसेच सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी कोणती पावले उचलली याबाबतही माहिती दिली. मात्र, विरोधक एमएसपीवर कायदा करण्याच्या मागणीवर ठाम असल्याने सभागृहात गदारोळाची स्थिती कायम राहिली.

Advertisement

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी पाचवा दिवस होता. हरियाणातील हिस्सारचे खासदार जय प्रकाश यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान पंतप्रधानांची हमी कोण स्वीकारणार? असा प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांना आजपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. पीएम किसान योजनेंतर्गत वर्षभरात फक्त 6000 ऊपये दिले जातात. 2019 मध्ये डिझेलचा दर 65 ऊपये प्रतिलिटर होता. आज दर 100 ऊपयांवर पोहोचला आहे पण किसान सन्मान निधी फक्त 6,000 ऊपये आहे. युरियाची किंमत कमी केल्यानंतर वजन कमी केले. असा दावा करत या अर्थसंकल्पाला शेतकरी विरोधी अर्थसंकल्प म्हटले पाहिजे असे ते म्हणाले.

मोदी सरकारकडून अन्नदात्याचा अपमान : सुरजेवाला

संसदेतून बाहेर आल्यानंतर काँग्रेस खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. देशाच्या संसदेत थेट प्रश्न विचारला गेला की सरकार एमएसपी कायदा आणणार की नाही? जुलै 2022 ते 2024 या कालावधीत एमएसपी कायदा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आला आहे की नाही? देशाच्या कृषीमंत्र्यांनी हे उत्तर फेटाळून लावले. कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मोदी सरकारने आज संसदेत 72 कोटी अन्नदाता शेतकरी आणि मजुरांचा अपमान केला आहे, असे ते म्हणाले.

राज्यसभा सभापतींचे विरोधकांना खडे बोल

सभागृहात शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधकांचा गदारोळ सुरू असतानाच राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी काँग्रेस खासदार प्रदीप तिवारी यांना कडक शब्दात सुनावले. ‘तुम्ही अन्नदात्याचा आदर करत नाही. चर्चेदरम्यान गोंधळ निर्माण करणे अयोग्य आहे. शेतकऱ्यांच्या वेदना मला कळतात. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे’ असे बोल ऐकवले. यावर तिवारी यांनी आपणही शेतकरी असल्याचे सांगत विरोधाचा सूर कायम ठेवला.

आमची युती फेव्हिकॉलने जोडलेली : लालन सिंह

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान पंचायत राज मंत्री लालन सिंह यांनी भूमिका मांडली. यावेळी निवडणुकीपूर्वी जेडीयू आणि टीडीपी भाजपसोबत आहेत. ही निवडणूकपूर्व युती आहे. आमची युती फेव्हिकॉलने जोडलेली आहे. ती कायम राहील, असे स्पष्ट केले. काँग्रेसवर निशाणा साधताना त्यांनी ‘99’ हा आकडा खूप धोकादायक असल्याचे सांगितले. जर तुम्ही लुडो खेळला असेल तर तुम्हाला साप चावल्यानंतर  ‘99’ वरून एकदम खाली आलेल्याची आठवण असेलच, असा टोमणा त्यांनी मारला.

कंगनाने मानले अर्थमंत्र्यांचे आभार

तसेच हिमाचलच्या मंडीतील भाजप खासदार कंगना रनौत यांनी गेल्या 10 वर्षांत आपली अर्थव्यवस्था झपाट्याने वाढल्याचा दावा केला. सध्या मांडण्यात आलेला अर्थसंकल्प देशासाठी उत्तम असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त केला. हिमाचलमध्ये पूर आला असून जीवित व वित्तहानी झाली. तेथील काँग्रेस सरकार बेफिकीर आहे. अर्थमंत्र्यांनी हिमाचलसाठी विशेष मदत निधीची घोषणा केल्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत, असे त्या पुढे म्हणाल्या.

Advertisement
Tags :

.