शपथ घेण्यावरून महायुतीच्या मेळाव्यात गोंधळ; करवीरच्या ठरावधारकांचा सवाल; बैठकीत शाब्दिक चकमक
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पॅनेल टू पॅनेल मतदान करण्यासाठी ठरावधारकांकडून शपथा घेतल्या जात असताना, करवीर तालुक्यातील मेळाव्यातच यावरून वादाची ठिणगी पडली. पॅनेल टू पॅनेल मतदानासाठी आम्हाला शपथा घ्यायला लावता, म्हणजे तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? असा सवाल ठरावधारकांनी महायुतीच्या नेत्यांना केला. शपथ नेमकी कुठे घ्यायची, यावरून गोकुळचे माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ, माजी संचालक रघु पाटील आणि बाळासाहेब खाडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
करवीर तालुक्यातील ठरावधारकांचा मेळावा मंगळवारी पुईखडी येथे आयोजित केला होता. शपथविधीसाठी राधानगरी तालुक्यातील एका देवस्थानचा नारळ आणि अंगारा आणण्यात आला होता. मात्र, शपथा सौंदत्ती डोंगरावर भंडारा उचलून घेण्याच्या स्वरूपात व्हाव्यात, अशी भूमिका माजी चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी मांडली. त्याला रघू पाटील यांनी विरोध करत हॉलमध्येच शपथ घेण्याचा आग्रह धरला. माजी संचालक बाळासाहेब खाडे यांनीही पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. यावरून तिघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
दरम्यान, शपथ घेण्याच्या आग्रहावरून ठरावधारकांनीही नाराजी व्यक्त केली. पासार्डेचे सरपंच विष्णू पाटील यांनी पी. एन. पाटील गटाला जागावाटपात करवीरवर अविश्वास दाखवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच मेळावा आटोपता घेण्यात आला. अखेर नारळ आणि अंगाऱ्याचे ताट ठरावधारकांसमोर फिरवण्यात आले. काही ठरावधारकांनी शपथ घेतली, तर काहींनी शपथ न घेताच सभास्थळ सोडल्याचे समजते.
मेळाव्याला खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषदेचे माजी चेअरमन राहुल पाटील, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांच्यासह माजी संचालक उपस्थित होते.
'त्या' अटी बंद करा
पासार्डेचे सरपंच विष्णू पाटील यांनी दूध संस्थांना संचालकांच्या शिफारसपत्राची गरज भासल्यास तालुक्यातील संस्था नसल्याचे कारण पुढे केले जाते, असे त्यांनी निदर्शनास आणले. दूरच्या तालुक्यांतील दूध संस्थांना उपलब्ध संचालकांनी शिफारसपत्र यावे, संबंधित तालुक्यातील संचालकाचेच शिफारसपत्र आवश्यक असल्याची अट बंद करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
