For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंचाला धक्काबुक्की, आंदोलकांवर लाठीचार्ज

02:55 PM Jan 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंचाला धक्काबुक्की  आंदोलकांवर लाठीचार्ज
Advertisement

आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता

Advertisement

तिसवाडी : युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी वादग्रस्त पंचसदस्य शंकर नाईक याला धक्काबुक्की केली. चिंबलवासियांनी शंकर नाईकने सार्वजनिक माफी मागण्याची मागणी केली, पण नाईक यांनी माफी मागण्यास नकार दिला. यामुळे काल मंगळवारी आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी शंकर नाईकला धक्काबुक्की केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यामुळे हे आंदोलन आता हिंसक वळण घेईल, अशी भीती निर्माण झाली आहे. मामलेदारांच्या आदेशाने हा लाठीचार्ज झाला असून महिलांसह जमावाने पोलिसांच्या दबावाला न जुमानता विरोध सुरू ठेवला. यामुळे चिंबल गावकऱ्यांमध्ये युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्पाबाबत तसेच स्थलांतरितांबाबत प्रचंड रोष आहे, हे स्पष्ट झाले.

लाठीचार्जच्या आदेशावर टीका 

Advertisement

मामलेदारांच्या लाठीचार्जच्या आदेशावर टीका होत आहे.अनुसूचित जमातीच्या महिलांवर हा लाठीचार्ज झाल्याने राज्यभरात प्रचंड नाराजी पसरली आहे. चिंबल गावातील तोयार तलावाजवळ हे प्रकल्प प्रस्तावित आहेत.गावकरी आणि पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे की,यामुळे तलावाचे पर्यावरणीय संतुलन बिघडेल, पाण्याचा स्रोत धोक्यात येईल आणि पणजीसह परिसरात पूर येण्याचा धोका वाढेल. या प्रकल्पांना ग्रामसभेत तीन वेळा विरोध झाला असूनही, सरकारने परवानग्या दिल्याचा आरोप आहे. न्यायालयानेही काही काळासाठी बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले होते, तरीही काम सुरू ठेवल्याचा दावा केला जात आहे.

गाव मूळ गोमंतकीयांचे

रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) नेते अजय खोलकर यांनी सांगितले की प्रमोद सावंत सरकारने बहुजन समाजाला गृहित धरू नये. स्थलांतरितांनी गावातील स्थानिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, कारण हे गाव मूळ गोमंतकीय लोकांचे आहे. खोलकर यांनी सरकारला इशारा दिला की, बहुजन समाज एकजुटीने विरोध करेल आणि येणाऱ्या निवडणुकीत याचा परिणाम दिसेल.

दिवसेंदिवस तीव्र होतेय आंदोलन

चिंबल गावकरी दिवसेंदिवस आंदोलन तीव्र करत आहेत. उपोषण, मोर्चे, विधानसभेकडे मोर्चा असे विविध पातळ्यांवर विरोध सुरू आहे. पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि पाण्याचे संरक्षण यासाठी गावकरी एकत्र आले आहेत. हे आंदोलन केवळ चिंबलपुरते मर्यादित न राहता संपूर्ण गोव्यामध्ये पसरण्याची शक्यता आहे. सरकारने गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करून प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पंच, सरपंचाचे घुमजाव

लोकांना हे दोन्ही प्रकल्प नको असेल, तर आम्हाला देखील हे प्रकल्प नको असा घुमजाव वादग्रस्त पंचसदस्य शंकर नाईक यांनी घेतला आहे. अगोदर आपण प्रकल्पांचे सर्मथन केले होते, तेव्हा गावात रोजगार मिळणार म्हणून समर्थनात बोललो होतो, पण लोकांच्या इच्छा पुढे काही नाही, असे असे शंकर नाईक म्हणाले. दरम्यान सरपंच संदेश शिरोडकर यांनी आपण या प्रकल्पाला मंजूरी दिली नव्हती, असे स्पष्ट केले आहे. आम्ही परवानगी नकारली होती, परंतु नंतर यावरून पंचायत संचलनालयाकडून परवानगी देण्याचा निर्देश आला होता. आपण गावकऱ्यांसोबत असून त्यांच्या मर्जीशिवाय प्रकल्प येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.