युपीआय पेमेंट शेजारील देश नेपाळमध्येही?
आरबीआय-नेपाळ यांच्यात स्वाक्षरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसला (युपीआय) संपूर्ण जगाने मान्यता दिली आहे. श्रीलंका आणि मॉरिशसनंतर आता तुम्ही नेपाळमध्येही युपीआय प्लॅटफॉर्म सहज वापरण्यास सक्षम होणार आहे. भारताची केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नेपाळची नेपाळ राष्ट्र बँक यांनी भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस आणि नेपाळच्या नॅशनल पेमेंट्स इंटरफेसच्या एकत्रीकरणासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या उपस्थितीत हा करार झाला. नेपाळमध्ये युपीआय कार्यप्रणाली सुलभ करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय शाखेने करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दोन वर्षांनी हा करार झाला आहे.
पेमेंट सहज केले जाईल
या कराराचा उद्देश भारत आणि नेपाळ दरम्यान जलद पेमेंटसाठी एक प्रणाली स्थापित करणे आहे. याद्वारे दोन्ही देशांचे नागरिक युपीआयद्वारे सीमापार पेमेंट करू शकतील. युपीआय व एनपीआय लिंकेजद्वारे पेमेंट सिस्टमचे जलद एकत्रीकरण भारत आणि नेपाळमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत करणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.