For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ

06:58 AM Jan 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिहारच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ
Advertisement

नितीशकुमारांचा लालूंशी काडीमोड : भाजपशी संधान : नव्या सरकारचा आज शपथविधी

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारमधील नितीश-लालू यांच्यातील युती (महाआघाडी) तुटल्यात जमा आहे. नितीश कुमार रविवारी सकाळी राज्यपालांकडे राजीनामा सादर करत भाजपसोबत नवे सरकार स्थापन करण्याचा दावाही करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. जेडीयू कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या चार-पाच दिवसात घडलेल्या या राजकीय उलथापालथीच्या घटनानंतर नितीश पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास ते नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होतील.

Advertisement

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून संजद व राजदमध्ये वाद टोकाला गेला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे रविवारी नवीन सरकार बनवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. नितीश कुमार यांनी रविवारी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. रालोआप्रणित सरकारमध्ये नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करण्यात येणार असून भाजपच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्री करण्यात येणार असल्याचे समजते.   नवीन सरकार बनल्यास सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्री बनवले जाऊ शकते. तर राजद-संजद महाआघाडीपूर्वी भाजप-संजद आघाडी असताना जितके विभाग भाजपकडे होते ते त्यांना परत दिले जाऊ शकतात. बिहारमधील या गोंधळादरम्यान भाजप प्रभारी विनोद तावडे यांनी नितीश कुमार ‘इंडिया’पासून वेगळे होण्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

नितीशकुमारांना जनता धडा शिकवेल : आरजेडी

बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर आरजेडी सुप्रीमो लालू यादव यांचे निकटवर्तीय आणि राज्यसभा खासदार अश्फाक करीम यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बिहारमधील आरजेडी-जेडीयू युतीबाबतचे चित्र अश्फाक करिब यांनी पूर्णपणे स्पष्ट केले आहे. बिहारमध्ये आरजेडी-जेडीयू युती तुटल्याचे अश्फाक करिब यांनी म्हटले आहे. आता बिहारची जनता नितीशकुमारांना कधीही माफ करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नितीशकुमार यांनी 19 वर्षात बिहारचे राजकारण अस्थिर केले आहे. बिहारमधील राजकीय समीकरण प्रत्येक क्षणी बदलत असल्याचेही ते पुढे म्हणाले.

बिहार सरकारमध्ये सध्या सर्व काही सुरळीत सुरू नसल्याचे संकेत मिळत आहेत. पाटण्यात झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात याचीच झलक दिसून आली. मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे एकमेकांपासून दूर बसलेले दिसले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळची एक खुर्ची रिकामी होती. हे प्रकार समोर आल्यानंतर राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्मयता अधिकच तीव्र झाली होती. काही दिवसांपूर्वीच राजद व जदयूतील संबंध बिघडल्याचे संकेत दिसत होते. नितीश कुमार यांनी ‘घराणेशाही’वर जोरदार टीका केल्यानंतर राज्यातील महाआघाडीमध्ये फूट पडण्याची चिन्हे दिसत असतानाच ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांनी स्पष्टीकरण दिले होते. याचदरम्यान, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी राजकारणात कायमचे दरवाजे बंद होत नाहीत. दरवाजे बंद होऊ शकतात तर उघडूही शकतात. राजकारण हा संभावनांचा खेळ असून काहीही होऊ शकते, असे म्हटले होते.

आरजेडीचेही व्यापक डावपेच

बिहारच्या बदलत्या राजकारणादरम्यान राष्ट्रीय जनता दलही (आरजेडी) मोठी खेळी करणार असल्याची चर्चा आहे. राज्याचे कृषिमंत्री आणि आरजेडी नेते कुमार सर्वजीत यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. आरजेडी सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याची घोषणा कुमार सर्वजीत यांनी केली. असे झाले तर राजीनाम्यापूर्वीच नितीश कुमार सरकार अल्पमतात येईल. कुमार सर्वजीत यांनी आपले अधिकृत वाहन परत केले आहे. यानंतर आरजेडीच्या इतर मंत्र्यांनीही आपली सरकारी वाहने परत करण्यास सुऊवात केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीएसोबत सरकार स्थापन करण्याच्या चर्चेदरम्यान बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असल्याने आरजेडी राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावाही करू शकतो. लालू आणि तेजस्वी यादव यांनी राबडीदेवी यांच्या निवासस्थानी राजद नेत्यांची बैठक घेतल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकांचा सपाटा

बिहारमध्ये झपाट्याने बदलत असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान रविवारी दुपारी 3 वाजता भाजप-जेडीयूच्या नव्या युती सरकारचा शपथविधी होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तसेच भाजप आणि जेडीयूमधील कराराचे समीकरण निश्चित झाले आहे. सद्यस्थितीत नितीशकुमार हे राज्याचे मुख्यमंत्री राहतील आणि भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असतील. याशिवाय सभापतीही भाजपचाच असण्याची शक्यता आहे. नितीश कुमारांनी शनिवारी सायंकाळी आपल्या निवासस्थानी आमदारांची बैठक घेतली. आता रविवारी सकाळी पुन्हा जेडीयु आमदारांची बैठक होणार असून त्यानंतर भाजप आणि जेडीयुच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

बिहारमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका?

लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका घेण्याच्या नितीश कुमार यांच्या मागणीवर गुप्तता बाळगली जात आहे. नितीश कुमार यांनी महाआघाडीतील काँग्रेस व राजद यांच्याकडेही हीच मागणी केली होती. मात्र, त्यांनी संजदची मागणी मान्य केली नाही. भाजप आता याबाबत काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.