Karad Politics : कोण कोठे जाईल? कोठे गर्दी होईल?, राजकारण अनिश्चिततेच्या भोवऱ्यात
'विकासा'चा ध्यास घेतलेले आणि 'निष्ठावान' म्हणून काठावर असलेले सर्वच इच्छुक राजकीय 'अस्वस्थ'
कराड : अमका म्हणतो आम्हाला सर्वसामान्यांचा 'विकास' करायचा आहे... तमका म्हणतो आम्ही 'निष्ठावान' आहोत. मलकापुरातील सध्याचे राजकारण पाहता 'विकासा'चा ध्यास घेतलेले आणि 'निष्ठावान' म्हणून काठावर असलेले आगामी निवडणुकीतील सर्वच इच्छुक राजकीय 'अस्वस्थ' आहेत.
विद्यमान स्थितीत कोण कोठे जाईल ? कोठे गर्दी होतेय म्हणून स्थानिक पातळीवर कोण कोणाला आपल्याकडे घेईल, या चर्चेने मलकापुरचे प्रभागनिहाय वातावरण ढवळून निघाले आहे. आमदार डॉ. अतुल भोसले आणि अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्याभोवती दक्षिणचे राजकारण फिरते. यंदा मात्र आमदार डॉ. अतुल भोसले यांनी राजकीय फिल्डींग टाईट लावली. त्यांच्या फिल्डींगसमोर काँग्रेसला दक्षिणेतील पहिला पराभव स्वीकारावा लागला.
प्रवेश झाले मात्र वेगवेगळे
मलकापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणवला जायचा. सन २०२४- २५ सालात काँग्रेसला 'हात' दाखवत 'कमळ' हातात घेण्यात प्रस्थापितच आघाडीवर राहिले. ज्या प्रस्थापितांच्या घराभोवती आजपर्यंत सत्तेची समिकरणे फिरत राहिली त्यांनीच आम्हाला सर्वसामान्यांचा विकास करायचा आहे असे सांगत भाजपाचे उपरणे घातले. माजी नगराध्यक्षा नुरजहाँ मुल्ला, माजी कराड दक्षिण मतदारसंघात विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान उपसरपंच सुहास कदम यांच्यासह अनेकजण अगोदरच भाजपाचा झेंडा घेऊन तयार होते. प्रमोद शिंदे यांनी माजी मंत्री बाळासाहेब पाटील कुटुंबांवरील प्रेम अबाधित ठेवत इकडे भाजपाला जवळ केले. माजी विरोधी पक्षनेते अजित थोरात यांच्यासारखा युबा भाजपाचे बळ वाढवू लागला. सलग दहा वर्षे बांधकाम सभापती राहिलेले राजेंद्र यादव यांनी मुंबईत पाच नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केला. गर्दीत कोठे आपले महत्त्व रहायचे म्हणून मागे राहिलेल्या चांदे काका–पुतण्यांनी २२ वर्षानंतर आपल्या राजकीय सोंगटी भाजपाच्या गोटात ढकलली.
काका- बाबा मनोमिलन राहणार का?
दरम्यान ३५ बर्षे आमदार राहिलेल्या विलासराव पाटील उंडाळकर यांचे सुपुत्र ॲङ उदयसिंह पाटील यांनी काँग्रेस सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. साहजिकच मलकापूर काँग्रेसमध्ये प्रत्येक घडामोडीत सक्रिय असणारे माजी नगरसेवक सागर जाधव, माजी उपसभापती कमल कुराडे यांच्यासह अन्य प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले. याव गेले, चांदे गेले...जाधव, कुराडेंसह अन्य राष्ट्रवादीत सामिल झाले.
उदयसिंह पाटील राष्ट्रवादीत गेले असले तरी त्यांचा स्थानिक राजकारणात काका- बाबा मनोमिलनाचा राजकीय पैरा कायम राहणार का? हा सुद्धा प्रश्न आहे. मात्र उंडाळकरांच्या प्रवेशानंतर काँग्रेसच्या बर्तुळात अस्वस्थता असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक कराड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष, मलकापुरचे माजी उपनगराध्यक्ष हे सुद्धा आपले उर्वरीत सैन्य घेऊन भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांनी मलकापुरात चांगलेच रान उठवले कारण आपली महत्त्वकांक्षा बाढवण्यासाठी जे भाजपात सामील झाले ते मनोहर शिंदे यांच्या येण्याच्या चर्चेने अस्वस्थ झाले.
भाऊंच्या डोक्यात नेमके काय?
मुळात इकडे काँग्रेसमध्ये निष्ठावंतांचे उपरणे घालून जाऊ का की नको या द्विधा मनस्थितीत असलेल्यांसह सर्वच अस्वस्थ दिसले. या पार्श्वभूमीवरच उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवकांसह प्रमुख इच्छुक, कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच घेतली. वास्तविक त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत अजुन कोणी तिकडे जाणार आहे का? याचा अंदाज घेतला.
मनोहर भाऊंच्या राजकारणाचे एक विशेष म्हणजे त्यांच्या डोक्यात कोणत्या विचारांचे वारे घोंगावतेय हे पट्टीच्या राजकारण्यालाही समजत नाही. साहजिकच बैठकीनंतर भाजपा प्रवेशाची 'हुल' उठली की उठवली गेली? ही नेमकी 'हुल'च आहे का? भविष्यात काही निर्णय होईल? हा निर्णय झाला तर 'निष्ठा' आणि 'विकास" या राजकीय पारड्यातील कोणाचे पारडे जड राहिल हे भविष्यात लक्षात येईल.
प्रभागनिहाय बैठका घेणार
माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी २६ एप्रिल रोजी माजी नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत मते जाणून घेतली. यामध्ये कार्यकर्त्यांची विकासकामे कशी करायची? या प्रश्नावर जोर होता. शिंदेंच्या पत्रकात म्हटले आहे की, प्रभागनिहाय बैठका घेऊन अडीअडचणींसह नागरिकांचीही मते जाणून घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिंदे यांच्या बैठकांनंतर पुढे काय होते? त्यावर बऱ्याच चर्चा सुरू आहेत.