MH Weather Update: पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार, IMD कडून रेड आणि ऑरेंज अलर्ट
येत्या 5 दिवसांत संबंधित जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update : आठ-पंधरा दिवसांनी उघडीप दिल्यानंतर कालपासून पुन्हा एकदा पावसाने दमदार सुरुवात केली आहे. 12 जून रोजी राज्यातील घाट विभागासह कोकण आणि परिसरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, आजपासून पुढील पाच दिवसांत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यामध्ये पुढील 24 तासांत कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे, रायगड, ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या विभागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
याशिवाय कोकण किनारपट्टी परिसरात दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार आहे. तसेच उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 50 ते 60 किमी वेगाने वारे आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात अशीच परिस्थिती असणार आहे.
हवामाना खात्याकडून आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांला रेड अलर्ट तर कोल्हापूर सांगली, रायगड, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही तासांत या भागांत पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्या (दि. 14) रोजी परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. तसेच 15, 16 आणि 17 जून रोजी किनारपट्टी भागांतील जिल्ह्यांना तसेच घाट विभागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या पाच दिवसांत संबंधित जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला अलर्ट रहावे लागणार आहे. तसेच मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय राज्यातील उर्रवरित जिल्ह्यांत ग्रीन आणि येलो अलर्ट जारी करण्यात आल आहे.