युपी वॉरियर्स 12 धावांनी विजयी
आरसीबी पराभूत, व्हॉलचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था / लखनौ
महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेतील येथे शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात जॉर्जीया व्हॉलच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर युपी वॉरियर्सने आरसीबीचा 12 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे आरसीबीचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून युपी वॉरियर्सला प्रथम फलंदाजी दिली. युपी वॉरियर्सने 20 षटकात 5 बाद 225 धावा जमविल्या. त्यानंतर आरसीबीने 19.3 षटकात सर्वबाद 213 धावा केल्या.
युपी वॉरियर्सच्या डावात हॅरीस आणि व्हॉल या सलामीच्या जोडीने 77 धावांची भागिदारी केली. हॅरीसने 22 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 39 धावा जमविल्या. हॅरीस बाद झाल्यानंतर व्हॉल आणि नवगिरी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 71 धावांची भर घातली. नवगिरीने 16 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह 46 धावा झोडपल्या. हेन्रीने 15 चेंडूत 4 चौकारांसह 19, इक्लेस्टोनने 2 चौकारांसह 13 धावा केल्या. व्हॉलने 56 चेंडूत 1 षटकार आणि 17 चौकारांसह नाबाद 99 धावा झळकविल्या. युपी वॉरियर्सच्या डावात 7 षटकार आणि 32 चौकार नोंदविले गेले. आरसीबीतर्फे वेरहॅमने 2 तर डीनने 1 गडी बाद केला. व्हॉलने 31 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह अर्धशतक पूर्ण केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आरसीबीच्या डावात रिचा घोषने 33 चेंडूत 5 षटकार आणि 6 चौकारांसह 69, मेघनाने 12 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 27, पेरीने 15 चेंडूत 6 चौकारांसह 28, बिस्तने 12 चेंडूत 2 चौकारांसह 14, वेरहॅमने 2 चौकारांसह 17 आणि स्नेह राणाने 6 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 26 धावा केल्या. आरसीबीच्या डावात एकूण 11 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. युपी वॉरियर्सतर्फे इक्लेस्टोन आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 3 तर हेन्रीने 2 तसेच सर्वानीने 1 गडी बाद केला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात दिल्ली 10 गुणांसह पहिल्या, गुजरात 8 गुणांसह दुसऱ्या, मुंबई इंडियन्स 8 गुणांसह तिसऱ्या तर युपी वॉरियर्स 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक: युपी वॉरियर्स 20 षटकात 5 बाद 225 (व्हॉल नाबाद 99, हॅरीस 39, नवगिरी 46, हेन्री 19, इक्लेस्टोन 13, अवांतर 8, वेरहॅम 2-43, डीन 1-47), आरसीबी 19.3 षटकात सर्वगडी बाद 213 (रिचा घोष 69, मेघना 27, पेरी 28, बिस्त 14, वेरहॅम 17, स्नेह राणा 26, अवांतर 7, इक्लेस्टोन व दिप्ती शर्मा प्रत्येकी 3, हेन्री 2 तर सर्वानी 1 बळी)