युपी वॉरियर्सला विजयाची नितांत गरज
वृत्तसंस्था / लखनौ
2025 च्या महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेत गुरुवारी येथे युपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळविला जाणार आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत राखण्यासाठी युपी वॉरियर्सला या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजयाची नितांत जरुरी आहे.
या स्पर्धेत युपी वॉरियर्स संघाला पाठोपाठाच्या सामन्यातील झालेल्या पराभवामुळे प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी चांगलेच झगडावे लागत आहे. या स्पर्धेतील लखनौचा टप्पा सुरू झाल्यानंतर यजमान युपी वॉरियर्सची कामगिरी असमाधानकारक झाली. येथे अलिकडच्या सामन्यात गुजरात जायंट्सने युपी वॉरियर्सचा 81 धावांनी दणदणीत पराभव केल्याने युपी वॉरियर्सला स्पर्धेच्या गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. आता त्यांचे प्राथमिक फेरीतील केवळ दोन सामने बाकी आहेत. युपी वॉरियर्सने यापूर्वीचे प्राथमिक फेरीतील सलग दोन सामने गमविले असून आता त्यांनी गुरुवारच्या सामन्यात पराभव पत्करला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येईल.
महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेतील लखनौमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात बेथ मुनीच्या दमदार फलंदाजीमुळे गुजरात जायंट्सने 5 बाद 186 धावा जमविल्या होत्या. लखनौच्या खेळपट्टीवर गुजरात जायंट्सच्या फलंदाजांनी चांगली फटकेबाजी केली. पण युपी वॉरियर्सची फलंदाजी या सामन्यात पूर्ण कोलमडली. युपी वॉरियर्स संघातील प्रमुख फलंदाज सूर मिळविण्यासाठी अद्याप झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळते. गुजरात विरुद्धच्या सामन्यात युपी वॉरियर्सची स्थिती पहिल्या 10 षटकात 6 बाद 48 अशी केविलवाणी झाली होती. त्यांच्या 6 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. पण या सामन्यात युपी वॉरियर्सने केवळ 105 धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार दिप्ती शर्मा, उमा छेत्री, राजेश्वरी गायकवाड, हॅरीस, हेन्री, इक्लेस्टोन यांच्यावर युपी वॉरियर्सच्या फलंदाजीची भिस्त राहिल.
बलाढ्या मुंबई इंडियन्स संघालाही आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी झगडावे लागत आहे. सध्या मुंबईचा संघ 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या स्पर्धेच्या फॉर्मेटनुसार गुणतक्त्यातील आघाडीचे तीन संघ अंतिम फेरीसाठी थेट पात्र ठरतील. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठी एलिमनेटर सामन्यात संघांना झुंझावे लागणार आहे. मुंबई इंडियन्सचे या स्पर्धेतील अद्याप तीन सामने बाकी आहेत. हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने 2023 साली झालेल्या पहिल्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. मात्र यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाने दर्जेदार कामगिरी करत आघाडीचे स्थान मिळविले आहे. दिल्ली कॅपिटल्स बरोबरच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी साफ कालमडली होती. त्यांना या सामन्यात 9 बाद 123 धावांपर्यंत मजल मारता आली होती. कर्णधार हरमनप्रित कौरला मोठी धावसंख्या रचता आलेली नाही. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात कौरने 16 चेंडूत 22 धावा जमविल्या होत्या. तर नॅट सिव्हेर ब्रंटने 22 चेंडूत 18 धावा केल्या होत्या. नॅट सिव्हेर ब्रंटने मुंबई संघाकडून यापूर्वीच्या पाच सामन्यात 272 धावा जमविल्या आहेत. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील झालेल्या युपी वॉरियर्स विरुद्धच्या सामन्यात ब्रंटने नाबाद 75 धावा झळकविल्या होत्या.
युपी वॉरियर्स संघ: दिप्ती शर्मा (कर्णधार), अंजली सर्वांणी, चमारी अट्टापटू, उमा छेत्री, इक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, आरुशी गोयल, क्रांती गौड, ग्रेस हॅरिस, चिनेली हेन्री, पूनम खेमनार, अॅलेना किंग, मॅकग्रा, किरण नवगेरी, श्वेता सेहरावत, गोहर सुलताना, सईमा ठाकुर आणि वृंदा दिनेश
मुंबई इंडियन्स संघ : हरमनप्रित कौर (कर्णधार), यास्तिका भाटीया, डी. क्लर्क, संस्कृती गुप्ता, एस. इशाकी, शबनीम इस्माईल, जे. कलिता, कमलिनी, अमनदीप कौर, अमनज्योत कौर, एस. किर्तना, अॅमेलिया केर, अक्षता माहेश्वरी, हिली मॅथ्युज, संजीवन सजना, नॅट सिव्हेर ब्रंट, सिसोदीया व ट्रायॉन
वेळ संध्याकाळी 7.30 वाजता