यूपी वॉरियर्स-गुजरात जायंट्स आज लढत
मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्सही आज आमनेसामने
वृत्तसंस्था / नवी मुंबई
2026 च्या महिलांच्या टी-20 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी येथे यूपी वॉरियर्सचा सलामीचा सामना गुजरात जायंट्सशी होणार आहे. या दोन्ही संघांना यापूर्वी या स्पर्धेमध्ये एकदाही जेतेपद मिळविता आले नसल्याने हे संघ यावेळी जेतेपदासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील. या दुपारच्या सामन्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियन्स महिला व दिल्ली कॅपिटल्स महिला यांच्यात दिवसातील दुसरा सामना होणार आहे.
मेग लॅनिंगकडे यूपी वॉरियर्सचे नेतृत्व सोपविण्यात आले असून ऑस्ट्रेलियाची अॅश्ले गार्डनर गुजरात जायंट्सचे नेतृत्व करीत आहे. यूपी वॉरियर्स संघाला लॅनिंगच्या रुपात नवा कर्णधार लाभला आहे. लॅनिंगने यापूर्वी सदर स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते आणि तिने सलग तीनवेळा दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत नेले होते. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिलीच्या गैरहजेरीत यूपी वॉरियर्सचा संघ कामगिरीत सातत्य राखण्यासाठी झगडत होता. प्रीमियर लीगच्या पहिल्या तीन स्पर्धांमध्ये यूपी वॉरियर्सला अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मात्र यूपी वॉरियर्सचा यावेळचा संघ समतोल राहण्यासाठी फ्रांचायझींनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या संघामध्ये शिप्रा गिरी ही एकमेव यष्टीरक्षक आहे. लीचफिल्ड आणि किरण नवगिरे ही सलामीची जोडी फलंदाजीसाठी राहील, असा अंदाज आहे. मधल्या फळीची जबाबदारी हरलीन देवोल आणि लॅनिंग यांच्यावर राहील. सोफी इक्लेस्टोन, दीप्ती शर्मा, अनुभवी शिखा पांडे आणि क्रांती गौड यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहील.
गुजरात जायंट्स संघ यावेळी मोठ्या आत्मविश्वासाने ही स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत गुजरात जायंट्सने प्लेऑफमध्ये स्थान मिळविले होते. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी गार्डनरच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंट्स संघाची फलंदाजी निश्चितच भक्कम वाटते. बेथ मुनीकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही स्पर्धा हुकणारी सोफी डिव्हाईनचे यावेळी या स्पर्धेत पुनरागमन झाले आहे. गुजरात जायंट्सच्या गोलंदाजीची जबाबदारी प्रामुख्याने रेणुकासिंग ठाकुर, किम गार्थ आणि के. गौतम यांच्यावर राहील. गार्डनर, वेरहॅम, राजेश्वरी गायकवाड आणि तनुजा कंवर हे या संघातील फिरकी गोलंदाज आहेत.
यूपी वॉरियर्स: श्वेता सेहरावत, दिप्ती शर्मा, सोफी इक्लेस्टोन, मेग लेनिंग (कर्णधार), लिच फिल्ड, किरण नवगिरे, हर्लिन देवोल, क्रांती गौड, आशा शोभना, डी. डॉटीन, शिखा पांडे, शिप्रा गिरी, सिमरन शेख, चार्ली नॉट, चोले ट्रायोन, सुमन मीना, जी. त्रिशा, प्रतिका रेवा.
गुजरात जायंट्स : अॅश्ले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी, सोफी डिव्हाईन, रेणुकासिंग ठाकुर, भारती फुलमाली, तितास साधू, काश्वी गौतम, कनिका आहुजा, तनुजा कंवर, जॉर्जिया वेरहॅम, अनुष्का शर्मा, हॅपी कुमारी, किम गार्थ, शिवानी सिंग, डॅनी वेट हॉज, राजेश्वरी गायकवाड आणि आयुषी सोनी.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वाजता.
मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, जी. कमलिनी, नॅट सायव्हर ब्रंट, निकोला कॅरी, पूनम खेमनार, शबनिम इस्माईल, संस्कृती गुप्ता, सजीवन सजना, सायका इशाक, अमनजोत कौर, क्रांती रे•ाr, हेली मॅथ्यूज, त्रिवेणी वसिष्ठ, राहिला फिरदौस.
दिल्ली कॅपिटल्स : जेमिमा रॉड्रिग्स (कर्णधार), शेफाली वर्मा, लीरा वोल्वार्ट, लुसी हॅमिल्टन, मारिझेन कॅप, अॅलाना किंग, स्नेह राणा, अॅनाबेल सदरलँड, मिन्नू मणी, श्री चरणी, तानिया भाटिया, दिया यादव, चिनेली हेन्री, लिझेली ली, मडिवाला ममता, निकी प्रसाद, नंदनी शर्मा.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून