स्वच्छताही सेवा पोस्टरचे अनावरण
जिल्हा पंचायत सभागृहात दिशा समितीची त्रैमासिक बैठक
बेळगाव : जिल्हा विकास समन्वय व देखरेख समिती (दिशा) समितीची 2024-25 सालासाठीची त्रैमासिक बैठक जिल्हा पंचायत सभागृहात नुकताच पार पडली. बैठकीत स्वच्छताही सेवा कार्यक्रमाचे पोस्टर अनावरण करण्यात आले. दिशा समितीचे अध्यक्ष खासदार जगदीश शेट्टर, चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, योजना संचालक रवी बंगारप्पनावर, मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर व इतर अधिकारी उपस्थित होते. स्वच्छताही सेवा या पोस्टरचे अनावरण करून बोलताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार हा उपक्रम 17 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत तो चालणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. असे सांगतानाच जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्याबरोबरच सफाई कामगारांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा सल्लाही खासदारांनी दिला.
शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या
अतिवृष्टीमुळे पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी. याबरोबरच नादुरुस्त रस्ते, पुलांची दुरुस्ती करावी अशी सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. दिशाच्या बैठकीत शिष्टाचाराचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. केंद्र सरकार पुरस्कृत योजनांच्या कामांचा शुभारंभ करताना शिष्टाचाराचे उल्लंघन करण्यात येत आहे. असे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही दिला.