असामान्य प्रामाणिकपणा
रस्त्यात किंवा अन्य सार्वजनिक स्थानी सापडलेली वस्तू अगर पैसे ज्याचे असतील त्याला देणे, हे प्रामाणिकपणाचे उदाहरण आहे. पण एखाद्या स्वच्छता कर्मचाऱ्याला कचरा कुंडात तब्बल 10 लाख रुपये मिळावेत आणि ते त्याने परत करावेत, असा प्रसंग घडला तर तो प्रामाणिकपणा असामान्यच म्हणावयास हवा. ही घटना पुणे शहराच्या सदाशिवपेठ या भागात नुकतीच घडली आहे. या भागात काम करणाऱ्या सार्वजनिक स्वच्छता कर्मचारी अंजू माने यांना कचरा कुंड स्वच्छ करत असताना 10 लाख रुपयांच्या नोटांचे गठ्ठे एका पिशवीत ठेवल्याचे आढळून आले होते. वास्तविक कोणालाही असे घबाड हाती आल्यानंतर ते आपल्याकडेच ठेवून घेण्याचा मोह झाला असता. तथापि, अंजू माने यांनी तसे केले नाही. त्यांनी जेव्हा ही पिशवी पाहिली, तेव्हा त्यांना ती औषधांची पिशवी वाटली. कित्येकदा उपयोग दिनांक उलटलेली औषधे पिशव्यांमध्ये भरुन टाकून दिली जातात. त्यांनी कुतुहल म्हणून पिशवी उघडून पाहिली, तेव्हा त्यात त्यांना 500 रुपयांच्या नोटांचे अनेक गठ्ठे आढळून आले. त्यांनी ती पिशवी आपल्या अधिकाऱ्यांकडे देण्याचा निर्णय घेतला, जेणेकरुन ती पिशवी त्या पैशांच्या मालकाला देता येईल. त्यामुळे त्यांनी ती पिशवी स्वत:कडे घेतली आणि त्या तेथून जाऊ लागल्या होत्या.
तेवढ्यात जवळच त्यांना एक माणूस अत्यंत कावऱ्या बावऱ्या चेहऱ्याने आणि चिंताक्रांत अवस्थेत काहीतरी शोधत आहे, असे दिसून आले. तेव्हा त्याने आपले बरेच पैसे कोठेतरी पडल्याची माहिती त्यांना दिली. त्यांनी त्याच्याकडे किती रक्कम होती आणि कोठे पडली इत्यादी चौकशी केली. त्यावरुन त्यांना ही पिशवी याच माणसाची आहे, हे माहीत झाले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता, त्यांनी ही रक्कम एक पैसाही स्वत:कडे ठेवून न घेता त्या माणसाला परत दिली. त्या माणसानेही अंजू माने यांच्या प्रामाणिकपणाचा आदर केला. त्यांना घरी बोलावण्यात आले. त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना साडी तसेच रोख पैसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. ही घटना 20 नोव्हेंबरची आहे. सध्या या परिसरात अंजू माने यांच्या प्रामाणिकपणाची चर्चा होत असून लोक त्यांची प्रशंसा करीत आहेत. या घटनेला सोशल मिडियावरही मोठी प्रसिद्धी मिळत आहे.