For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंमळनेरची अस्पृश्यता!

06:37 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंमळनेरची अस्पृश्यता
Advertisement

अंमळनेर नगरीत पार पडलेल्या अखिल भारतीय आणि विद्रोही मराठी साहित्य संमेलनाने मराठी भाषिकांना काय दिले? असा प्रश्न विचारण्याची खरोखरच वेळ आलेली आहे. साने गुरुजी आणि बहिणाबाई चौधरी यांच्या नगरीत होणारे हे संमेलन, आपुलकीचे आणि स्नेहाने भरलेले असायला पाहिजे होते. मराठी साहित्यरुपी झुडपावर सुगरणीने बांधलेल्या अनेक खोप्यांप्रमाणे साहित्य संस्थांची अभिजन आणि विद्रोही अशी दोन खोपी असती आणि त्यांनी आपापले खोपे चांगले सजवले असते, तरी मराठी रसिकांना साहित्याच्या झुळुकेसरशी होणाऱ्या त्या दोन खोप्यांच्या हेलकाव्याना पाहून आनंद झाला असता. पण, इथे साहित्य सोडून भोजन देणाऱ्या सुगरणींच्या पदार्थांवर ताव मारत दोन्ही बाजूंनी फक्त असमाधनाची करपट ढेकर बाहेर पडली. हे खूपच वाईट झाले. या वाईटातही चांगले शोधून काढण्याचा कोणी जर प्रयत्न केला तर, साने गुरुजींचा आत्मा तेथे वास करतो, असे मराठी रसिक नक्कीच मानेल. नाहीतर सर्व साहित्यिकांनी तेथे जमून काय शोधले? ते आपण पाहत आहोतच. अंमळनेर येथे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले आणि ते रसिकांच्या लक्षात दीर्घ काळ राहिले असे खरोखर होईल का? तसेच विद्रोही संमेलन देखील लक्षात राहील का? याचे समान उत्तर ‘नाही’ असेच आहे. आयोजक आणि मूठभर लोक सोडले तर बाकीच्यांना अगदी महिन्याभराने संमेलन कितवे होते? हा प्रश्नमंजुषेतील प्रश्न वाटला तर नवल वाटण्याचे कारण नाही. अखिल भारतीय संमेलनातून उठून अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे हे आपले मित्र असलेले विद्रोहीचे अध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे यांची भेट घेण्यासाठी विद्रोही मंडपात आपल्या पन्नासभर सहकाऱ्यांसह पोहोचले. त्यांचे स्वागत तिथे झाले पाहिजे होते. पण, कार्यक्रम सुरू असताना व्यत्यय येतो म्हणून तिथल्या आयोजक ढमाले आणि इतरांनी त्यांना बाजूला नेले. मंडपाबाहेरच गोड खाऊन शोभणे परतले. आपल्याला अस्पृश्यांची वागणूक मिळाली अशी त्यांची भावना झाली. हे गंभीरच. पण, आपण म्हणजे न्या. नरेंद्र चपळगावकर नाही, याची जाणीव संमेलनाध्यक्ष शोभणे यांनी ठेवली पाहिजे होती. दोन्हीकडे समकालीन मंडळी असल्याने आणि दोघे दोन ध्रुवावर असल्यासारखे दोन्ही संमेलनांचे वर्तन असल्याने, गेल्यावेळी विद्रोहीच्या विचारपिठावर न्या. चपळगावकर यांचे स्वागत झाले तसे शोभणे यांचे होणे शक्य नव्हते. हे त्यांनीही ओळखून प्रतिक्रिया द्यायची होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून प्रतिमा परदेशी यांनीही अखिल भारतीय संमेलनाला गर्दी कमी होऊ लागल्याने त्यांना आमच्याकडे यावे लागले, अशी प्रतिक्रिया देणेही आवश्यक होते का? इतकेही दोन्ही बाजूचे साहित्यिक एकमेकाला समजाऊन घेऊ शकत नाहीत का? विद्रोही फुलेंची परंपरा मानतात. त्यांनी संमेलनाला घालमोडे दादा म्हटले त्याच काळात त्यांच्या अखंडाशी जोडून घेतले असते तर फुलेंचे नाव घेऊन नवे विद्रोही संमेलन झाले नसते. ही चूक लक्षात न घेता शोभणे यांनी विद्रोहीच्या विचारपिठावर जाणे ही परंपरा बनवण्यापेक्षा मूलभूतरित्या बदलायला सुरुवात करावी. नंतर त्यांच्या अध्यक्षांना स्वत:च्या व्यासपीठावर निमंत्रित करून त्यांचे ऐकले असते आणि त्यांच्या विचारपिठावर आपले मनोगत ऐकले जाईल असे काही आधीच नियोजन केले असते, तर ते ठीक होते. केवळ दिखाऊपणा म्हणून एकाच गावात असलेल्या दोन परस्पर विरोधी विचारांच्या मंडळींनी एकीच्या आशेने न होणारा आग्रह धरण्यात अर्थ नाही. अभिजन साहित्य संमेलन आणि विद्रोही यांच्यात दुवा साधायचा तर ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखोबा, जनाबाई या परंपरेपासून त्यांना बरेच काही घ्यावे लागेल. त्या साहित्याची बरोबरी सोडा त्या परंपरेशी जवळीकसुध्दा आजचे अभिजन आणि विद्रोही साहित्य साधू शकलेले नाही. हे वास्तव असताना नसता खटाटोप काय कारणांनी केला गेला? हे सत्यच आहे की, विद्रोहितील गर्दी आता बरीच फुलायला लागली आहे. पण, म्हणून त्यांच्या कंपूत तयार झालेले नाहीत असेही नाही. म्हणजे समता आणि बंधुतेच्या कुठल्या पायरीवर हे संमेलन आज पोहोचले आहे? आणि इकडे शाळकरी मुलांना मंडपात बसवून समारोप घडवायला लागत असताना आपण अखिल भारतीय आहोत अशी मिजास करण्याचे मोठेपण आपल्यात उरले आहे का? नसेल तर का नाही? एखाद्या ग्रामीण संमेलनाची व्हावी तशी आपली परवड का होत आहे आणि आमच्यामुळे तुम्हाला राजकीय कादंबरीचे खाद्य मिळाले असे सांगण्याचे राजकारण्यांचे धाडस कसे होत आहे? साने गुरुजी आणि बहिणाबाईंच्या नगरीत आलेल्या साहित्यिकांना आपापल्या परंपरेचा केवळ अभिमान आहे म्हणून ते दोन तट करून बसलेले नाहीत तर दोघांच्या समन्वयातला जो अडथळा आहे तो त्यांना मान्य करायचा नाही. परिणामी दोन तट प्रत्येकवर्षी दिसत आहेत. त्यात कधीतरी सुखावणारी झुळूक येऊन जाते तर कधी दोन्ही बाजूंनी वणवा पेटवला जातो. या रागाच्या पलीकडे मराठी साहित्य आणि मराठी भाषिक जनता आहे. अभिजात मराठीचा दावा गेली दहा वर्षे करून सुध्दा संमेलनात अभिरूप न्यायालयाचे सोंग आणावे लागते. मराठीला तातडीने अभिजात दर्जा द्या असा ठराव दहा-दहा वेळा करावा लागतो आणि त्याच्या अंमलबजावणीवर केवळ विधी मंडळाचे अधिवेशन आणि संमेलनात सोपस्कार पार पाडले जातात. त्यापुढे जाऊन मराठीचा स्वाभिमान दाखविण्याचे धाडस कोणत्याच काळातील सत्ताधारी करत नाहीत. त्यांना ठणकावून सांगण्याचे, साहित्य संमेलनातून योग्य संदेश देण्याचे ठरावही येत नाहीत. मराठी भाषिकांच्या व्यथा आणि वेदना या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या छक्कड गाण्यापुरत्या आणि संमेलनाची शोभा वाढविण्यापूरत्या येत राहतात. त्यांच्या जगण्याचे प्रश्न तळमळीने मांडण्यासाठी कोणी पुढे येत नाही आणि त्यांचे प्रतिबिंबसुध्दा त्या साहित्यात उमटत नाही. ज्यांच्या साहित्यातून ते उमटते ते या दोन्ही परंपरांच्या खिजगणतीतही नाहीत. मराठी वाचकांचे मन घडवणे, त्यांच्या विचाराला आकार देणे आणि त्याला स्वयंप्रज्ञ बनवणे ही आपली जबाबदारी आहे हे आता या संमेलनांना ओरडून ऐकू येईपर्यंत सांगत राहिले पाहिजे. नाहीतर उद्दिष्टांपासून दूर भरकटत चाललेली ही संमेलने बेदखल होत राहतील. याचा विचार अखिल भारतीय म्हणवणाऱ्या संमेलनाने सर्वात आधी केला पाहिजे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.