For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवकाळीचे संकट

06:05 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
अवकाळीचे संकट
Advertisement

राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांना अवकाळी पावसाने दिलेला दणका म्हणजे दुष्काळात तेरावाच म्हटला पाहिजे. मागच्या हंगामात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दमदार पावसाची नोंद झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचीही नोंद झाल्याने काही भागांना ओल्या दुष्काळाशी सामना करावा लागला. तर चांगल्या पावसाने काही ठिकाणी पीक पाणी उत्तम आल्याचेही दिसून आले. खरीपाइतकाच रब्बी हंगामही शेतकऱ्याकरिता महत्त्वाचा असतो. या हंगामामध्ये धान्ये, कडधान्ये, भाजीपाला, फळबागा फुलवण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. परंतु, अवकाळीच्या संकटाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला हात हिरावला गेल्याचे चित्र हेलावणारेच म्हणता येईल. विदर्भ, मराठवाड्यात आजही मोठ्या प्रमाणात शेती होते. गहू, हरभरा, मका, ज्वारी, करडई यांसारखी पिके घेण्यास शेतकरी प्राधान्य देतात. मात्र, गारपिटीचा तडाखा व अवकाळीने या दोन्ही विभागांत सगळे होत्याचे नव्हते होऊन गेले. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हरभरा काढणीला आलेल्या अवस्थेत होता. मात्र, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. त्यामुळे हरभरा पीक मातीमोल झाले. याशिवाय गहू व मका पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे. मराठवाड्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. तसा दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला आहे. मधल्या काळात कोरड्या दुष्काळाने या भागाला हैराण केले. मागच्या काही दिवसांत ओला दुष्काळ व गारपिटीने मराठवाड्याला तडाखा दिला आहे. अडचणींचे डोंगर उभे असूनही शेती करण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल असतो. यंदाच्या रब्बी हंगामातही नेहमीच्या उत्साहात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये लागवड झाली. रब्बी ज्वारी व अन्य पिकांसाठी बळीराजाने घाम गाळला. परंतु, अवकाळी व वादळी पावसाने या कष्टावर पाणी फेरले. अवकाळीत ज्वारी, गव्हाला मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येते. परभणीमध्ये ज्वारी, गव्हासह हरभरा, करडईचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. तर बीडमध्येही या पिकासह कांदा, भाजीपाला, टरबूज-खरबूज पिकाचे नुकसान झाले आहे. नांदेडमध्येही हेच चित्र आहे. कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये आंबा, काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. तथापि, मागच्या काही दिवसांपासून या पिकांना हवामान बदलाची प्रचंड झळ बसताना दिसते. खरे तर ही दोन्ही पिके संवेदनशील आहेत. प्रचंड उन्हाळा, ढगाळ वातावरण, पाऊस अशा अनेक घटकांचा परिणाम मोहोरावर होत असतो. वास्तविक या वर्षी मोहोर मुबलक होता. त्यामुळे आंबा उत्पादन विक्रमी होण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, आधी ढगाळ वातावरण व नंतर अवकाळी पावसाने आंबा व काजू उत्पादकांची निराशा केल्याचे पहायला मिळते. याशिवाय राज्याच्या काही भागांत द्राक्ष पिकाचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. शेती हा बेभरवशी व्यवसाय म्हणून ओळखला जातो. तथापि, बदलत्या हवामानाशी झुंजत राज्यातील, देशातील शेतकरी जीव तोडून शेती करतात. चालू वर्ष तरी आपल्यासाठी चांगले जाईल, अशी आस त्यांच्या मनात होती. मात्र, लहरी हवामानाचा शेतकऱ्याला सततच फटका बसणार असेल, तर शेती करण्याची त्याची मानसिकता राहील काय, हा खरा प्रश्न आहे. हे पाहता बदलत्या हवामानावर अधिक व्यापक अभ्यास होणे व त्यातून नवीन पीक पद्धती निश्चित करणे, यावर आगामी काळात भर देणे क्रमप्राप्त ठरते. दरवर्षी 20 मेच्या आसपास अंदमानातून मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात होते. केरळात 1 जूनला, तर महाराष्ट्रात 7 जूनला मोसमी पावसाचे आगमन होते. कर्नाटक व गोवा राज्यांतही मागेपुढे याच  सुमारास पाऊस सक्रिय होतो. मात्र, मागील वर्षी पावसाचे वेळापत्रक बदलल्याचे दिसून आले. एरवी मे महिना हा कडक उन्हाळ्याचा म्हणून परिचित आहे. वळवाची एखाद दुसरी सर या महिन्यात पडते. परंतु, मागच्या मेमध्ये पावसाने महाराष्ट्रासह इतर राज्यांतील जिल्ह्यांमध्ये अक्षरश: धुडगूस घातला. त्याचा शेतीच्या नियोजनावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. अलीकडे गारपीट किंवा अवकाळी पावसाचे प्रमाणही वाढले आहे. जानेवारी, फेब्रुवारीच्या आसपास होणारा गारपिटीचा पाऊस शेती आणि शेतकऱ्यांकरिता तापदायक ठरताना दिसतो. हे पाहता बदलत्या हवामानाचा विषय आता ऐरणीवर आला, असे म्हणता येईल. म्हणूनच निसर्ग खरोखरच बदलतोय का, पावसाचे वेळापत्रक मागेपुढे होत आहे का, त्यानुसार पीकपद्धतीत काही बदल करावे लागतील का, यावर हवामान तज्ञ व कृषितज्ञांनी एकत्र येऊन ऊहापोह केला पाहिजे. त्याचबरोबर यासंदर्भातील निष्कर्ष जाहीर करून योग्य त्या गाईडलाईन दिल्या पाहिजेत. त्यातूनच शेतकऱ्याला आधार मिळू शकतो. अतिवृष्टी व अवकाळीच्या पावसानंतर प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे व इतर सोपस्कार पार पडतात. मात्र, शेतकऱ्यांना तातडीची मदत कशी करता येईल, हे पहायला हवे. त्याचबरोबर पीकविम्यातील अडचणी दूर करून शेतकऱ्याला कशा प्रकारे आश्वस्त करता येईल, हेदेखील पाहिले पाहिजे. सर्वांत महत्त्वाच्या क्षेत्रापैकी एक म्हणून कृषी क्षेत्राकडे आपण पाहतो. कारण, सजीवांचे भरण, पोषण हे शेतीमातीतूनच होते. अशा शेतीपुढच्या अडचणी वाढत असतील, तर शेतीतून बाहेर पडणाऱ्यांची संख्या आणखी वाढू शकते. मागच्या तीन दशकांमध्ये अनेकांनी शेतीतून अंग काढून घेतले आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांची संख्या घटते आहे. हे बघता शेतीपूरक वातावरण निर्माण करणे, ही शासनाची जबाबदारी असून, त्याकरिता जे जे काही करता येईल, ते सरकारने केले पाहिजे. ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमानवाढीचाही हवामानावर गंभीर परिणाम होत आहे. म्हणून येथून पुढच्या काळात पर्यावरणावर लक्ष द्यावे लागेल. डोंगरफोड, अनिर्बंध वृक्षतोड या गोष्टी रोखाव्या लागतील. जंगले, वनसंपदा यांचे संरक्षण करावे लागेल. पॅरिस हवामान परिषदेनंतर या आघाडीवर काहीशी जागृती झाली असली, तरी अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे. पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन, प्रदूषण  नियंत्रण यामध्ये प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न केला, तर बऱ्याच गोष्टी  साध्य होऊ शकतात.

Advertisement

Advertisement
Tags :

.