For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवकाळी आपत्ती

06:26 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
अवकाळी आपत्ती
Advertisement

पूर्वमोसमी, मोसमी आणि परतीचा अशी पावसाची सर्वसाधारण तीन भागात विभागणी केली जाते. त्याशिवाय स्थानिक उष्णतामान वा तापमानातून होणारा वळवाचा पाऊस हादेखील निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा घटक होय. किंबहुना, सद्यस्थितीत यामध्ये पावसाच्या आणखी एका प्रकारचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे अवकाळी पाऊस. अवकाळी म्हणजे काळ, वेळ न पाहता कधीही कुठेही पडणारा बेमोसमी पाऊस.

Advertisement

निसर्ग हा लहरी आहे. त्यामुळे पूर्वीही असा पाऊस व्हायचा. परंतु, अलीकडच्या काळातील अवकाळी पावसाचे वाढलेले प्रमाण व तीव्रता पाहता हे शेती, माती आणि मनुष्यजातीसमोरचे मोठेच संकट मानावे लागेल. मागच्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रासह लगतच्या भागात वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पाऊस होत आहे. या अवकाळी पावसाने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह अर्ध्या अधिक महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. यात एक लाख 22 हजार 993 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याचे पहायला मिळते. शेतकऱ्यांच्या अर्थकारणाच्या दृष्टीने खरिपाइतकाच रब्बी हंगामही महत्त्वाचा असतो. या हंगामात कांदा, गहू, मका, हरभरा, ज्वारीसह भाजीपाला व इतर पिके काढण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. तथापि, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके अक्षरश: मातीमोल झाली आहेत. आंबा, द्राक्षासह बागायती पिकांनाही या पावसाने तडाखा दिला आहे. हे पाहता शेतकऱ्यांसाठी सध्याचा काळ कठीणच ठरावा. मागच्या वर्षीदेखील अवकाळी पावसाने राज्याला दणका दिला होता. मेमध्येच पावसाला सुरुवात झाल्याने शेतीच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे चांगला पाऊस होऊनही शेतकऱ्यांना म्हणावा तसा लाभ झाला नाही. यंदाचे वर्षही महाराष्ट्रासह सबंध देशासाठी हवामानाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असेल, असेच संकेत सध्या मिळत आहेत. आठवडाभर देश तसेच राज्यात पाऊस कायम असतानाच आता एप्रिल महिन्यात महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह देशाच्या बहुतांश भागात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. स्वाभाविकच कमाल तापमान सरासरीइतके वा त्यापेक्षा कमी राहू शकते. त्यामुळे उन्हाळा सुसह्या वाटेलही. मात्र, अवकाळीतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची यादी मोठी असेल, हे लक्षात घ्यायला हवे. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन मुख्य ऋतू. निसर्गाच्या समतोलासाठी हे तिन्ही ऋतू आवश्यक असतात. मात्र, ऋतूचक्रात बिघाड झाला किंवा वेळापत्रक बदलले, की त्याचा पर्यावरणावर आणि शेतीवर गंभीर परिणाम होतो. मागच्या काही वर्षांत हेच चित्र पहायला मिळते आहे. शेती हा आजघडीला आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. सततची अस्थिरता, शेतमालाला योग्य भाव न मिळणे यांसारख्या कारणांमुळे दिवसेंदिवस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटते आहे. त्यात अवकाळीच्या आपत्तीमुळे शेतकऱ्यांची संख्या आणखी कमी होण्याचा धोका संभवतो. हे बघता अवकाळीच्या संकटापासून शेतीचे संरक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून काय उपाययोजना करता येतील, पीकपद्धतीत काही बदल करता येतील का, हे बघावे लागेल. आधीच युद्धसंघर्षामुळे इंधन, गॅस टंचाईबरोबरच महागाईच्या संकटाचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत अवकाळी पाऊस म्हणजे दुष्काळात तेरावाच ठरतो. हे ध्यानात घेऊन सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे क्रमप्राप्त ठरते. बळीराजा हा लाखोंचा पोशिंदा असून, त्यांना मायबाप सरकारने कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडू नये. अवकाळीने ग्रामीण भागामध्ये जसा कहर केला, त्याप्रमाणे शहरातही हाहाकार माजवल्याचे दिसते. महाराष्ट्रातील पुण्यासारखे शहर हे त्याचे जिवंत उदाहरण. विकासाचे मॉडेल म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. परंतु, त्याच पुण्यातील नियोजन व्यवस्था गुरुवारच्या पावसामध्ये पार वाहून गेल्याचे दिसून आले. रस्त्याला आलेले नद्यांचे स्वरुप, काडीपेटीप्रमाणे वाहणारी वाहने, ठप्प झालेली वाहतूक व्यवस्था हे काही विकसित शहराचे गमक ठरू नये. ‘ढगफुटी“चा शिक्का मारून शासन, प्रशासनाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.