For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

11:24 AM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी
Advertisement

वादळी वाऱ्यासह पावसामुळे ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या : विद्युत पुरवठा खंडित

Advertisement

वार्ताहर/किणये

तालुक्यात मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. काही जणांच्या घरावरील पत्रेही उडून गेले. या अवकाळी पावसामुळे किणये-बहाद्दवाडी भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सध्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळीही अधिक प्रमाणात उष्णता जाणवली. तर दुपारपासून आकाशात काळे ढग दिसून आले. सायंकाळी वादळी वाऱ्यासह तालुक्याच्या बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे उद्यमबाग-पिरनवाडी रस्त्यावर पाणी आले होते. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. शेतशिवारात गेलेल्या शेतकऱ्यांना मात्र या अवकाळी पावसामुळे भिजतच घरी यावे लागले.

Advertisement

वारंवार होत असलेल्या या अवकाळी पावसाचा काजू व आंब्याच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. वादळी वाऱ्याच्या पावसामुळे काजू व आंब्याची फळे पडून नुकसान झाले असल्याची माहिती उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. मंगळवारी झालेल्या पावसामुळे वातावरणात बदल होऊन हवामानात गारवा निर्माण झाला होता. देसूर, नंदीहळ्ळी भागात विटांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. सध्या वीट व्यावसायिकांनी विटांच्या भट्टी सुरू केल्या आहेत. मंगळवारी झालेल्या पावसामुळे कच्च्या विटा पूर्णपणे भिजून गेल्या. या विटांचे नुकसान झाले आहे. कच्च्या विटांवर ताडपत्री झाकत असल्याचे वीट व्यावसायिक व कामगार वर्ग दिसून आले. वादळी वारा व पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. तर काही ठिकाणी विद्युत तारांवर फांद्या पडल्या होत्या. यामुळे या भागात सुमारे दोन तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

Advertisement
Tags :

.