Satara News : कराड येथील ओंड परिसरात अवकाळीचा पावसाचा तडाखा!
04:14 PM Apr 04, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान व घरांची पडझड
कराड : कराड दक्षिणमधील ओंड परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागात घरांची व गोठ्यांची पडझड तसेच शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. ताबडतोब पंचनामे करून, बाधितांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
ओंड येथील थोरात मळा आणि शिंदे मळा परिसरात अनेक कुटुंबांची घरे मोठ्या प्रमाणात कोसळली आहेत. तसेच गोठ्यांची छप्परे उडून गेल्यामुळे जनावरांचेही नुकसान झाले आहे. याचबरोबर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आमदार डॉ. भोसले यांनी केली. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ.भोसले यांनी नुकसानग्रस्तांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या परिसरात ज्वारी, ऊस आणि कलिंगड अशा पिकांना मोठा फटका बसला असून, अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
डॉ. भोसले यांनी प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.