Kolhapur : शाहूवाडीत अवकाळी पावसाचा फटका; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
अवकाळी पावसामुळे भातपिंजर, गवताचे प्रचंड नुकसान
by अनिल पाटील
सरुड : शाहूवाडी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून सतत पडत असलेला अवकाळी पाऊस रब्बी पिकांसाठी उपयुक्त ठरत असला तरी या पावसामुळे वाळलेल्या भाताचे पिंजर आणि गवत यासारख्या जनावरांच्या सुक्या चाऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे. या नुकसानी मुळे भविष्यात जनावरांच्या सुक्या चऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या गवत आणि पिंजर या अवकाळी पावसाच्या तडाख्यातून कसे वाचवायचे, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
शाहूवाडी तालुका हा डोंगरांळ असल्याने येथील डोंगरमाथ्यावर गवताचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. चालू वर्षी पडलेला पाऊस व त्यामुळे निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे गवताची वाढ पूर्ण क्षमतेने झालेली आहे. पावसाळ्यात या वैरणीवर पशूधन अवलंबून असते. सध्या परतीच्या अवकाळी पावसाने झोडपल्याने डोंगरमाथ्यावरील गवत कुजायला लागले आहे. तसेच भाताचे काही ठिकाणी पसरलेले पिंजर व पिंजराच्या होळ्या रचलेल्या अवस्थेत आहेत. सध्या ओला चारा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असला तरी पावसाळ्यासाठी गवताचा व पिंजराचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे या चाऱ्याची शेतकऱ्यांना साठवणूक करावी लागते.
बऱ्याच भागातील शेतकऱ्यांनी गवत कापण्यास सुरुवात केली आहे. अवकाळीमुळे काढलेले गवत भिजायला लागले आहे. त्यामुळे नुकसानीची शक्यता वाढली आहे. नैसर्गिक संकटातून हा चारा वाचला तर अनेक शेतकऱ्यांना त्यातून आर्थिक फायदा होत असतो. अनेक शेतकरी उदनिर्वाहासाठी गवत व पिंजर अन्य गावात नेऊन विकत असतात. अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे या वैरणीची हानी होत आहे.