अवकाळी पावसाचा सत्तरीला दणका
लोकांची उडाली तारांबळ, दोन घरांसह दोन वाहनांचे नुकसान, विजेचे खांब तुटले, केरी, करंझोळ भागामध्ये गारांचा पाऊस
प्रतिनिधी / वाळपई
शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सत्तरी तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला. अचानक पाऊस आल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी घरावर झाडे कोसळली दुचाकी वाहनांवरही झाडे कोसळल्यामुळे नुकसान होण्याची घटना घडली. काही ठिकाणी वीज खांब मोडून वीजपुरवठा खंडित झालेला आहे. करंझोळ येथे गारांचा पाऊस पडल्याची माहिती हाती आलेली आहे.
दरम्यान, 17 ठिकाणी पडझडीच्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे लाखो ऊपयांची हानी झाल्याचा अंदाज वाळपई अग्निशामक दलाच्या सूत्रांनी वर्ताविला आहे. सकाळपासून वातावरणामध्ये उष्णता निर्माण झाली होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गडगटासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांची धावपळ उडाली. अचानकपणे सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली.
म्हाऊस येथे घरावर झाड कोसळले
म्हाऊस परिसराला वादळीवाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. परेश गावकर यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळून सुमारे 50 हजारांहून अधिक नुकसान झाले आहे. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी सदर ठिकाणी धाव घेऊन घरावर पडलेले झाड दूर केले. यामध्ये छप्पराची व घरातील सामानाचे नुकसान झाले. तसेच म्हाऊस येथील बारकेलो गावकर यांच्या मंडपाचे नुकसान झाले.
वेळूस गुंडेलवाडा येथे विजेचे खांब कोसळले
वादळीवाऱ्यामुळे वेळूस गुंडेलवाडा येथे झाडे कोसळून वीजखांब तुटून पडले. त्यामुळे वीजवाहिन्यांचेही मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी जलवाहिनी तुटल्यामुळे सदर भागातील वीजपुरवठा खंडित झालेला आहे. रात्री उशिरापर्यंत वीज खात्याचे कर्मचारी वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी काम करीत होते. या भागातील अनेक घरांचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. काही घरांच्या छपराची तर काही घरांच्या दर्शनी भागाची नुकसानी झालेली आहे. अनेक ठिकाणी घरगुती वस्तूंची नुकसानी झाल्याची माहिती हाती आलेली आहे.
बाराजण सत्तरी दोन दुचाकींचे नुकसान
बाराजण येथे दोन दुचाकींवर मोठी झाडे कोसळून सुमारे 2 लाखांची हानी झाल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या सूत्रांनी व्यक्त केलेला आहे. सदर दोन्ही दुचाकी झाडाच्या खाली पार्क करून ठेवल्या होत्या.
केरी करंझोळ परिसरात गारांचा पाऊस
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सत्तरी तालुक्यातील केरी व करंझोळ भागात गारांचा पाऊस पडण्याची घटना घडली. अचानक गारांचा पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले. करंझोळ गावातील नागरिकाकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास अर्धा तास गारांचा पाऊस सुरू होता. त्यामुळे गावामध्ये थंड वातावरण निर्माण झाले होते, यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला.
अग्निशामक दलाचे जवान रात्री उशिरापर्यंत कार्यरत
वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांवर तसेच रस्त्यावर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. वाळपई अग्निशामक दलाच्या दोन तुकड्या करून वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केल्या. दलाच्या जवानांनी रस्त्यांवर पडलेली झाडे हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे, अशी माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे काम सुरूच होते.