टिळकवाडी पहिले रेल्वेगेट येथे अवैज्ञानिक पद्धतीने गतिरोधक
वाहनचालकांची गैरसोय : हटविण्याची मागणी
बेळगाव : पहिले रेल्वेगेट येथे वाहनांची गती कमी करण्यासाठी गतिरोधक घालण्यात आला. परंतु हा गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीने घालण्यात आला आहे. यामुळे वाहनांच्या कोंडीत अधिकच वाढ होत असून चार चाकी वाहने हाकताना गैरसोय होत आहे. त्यामुळे हा गतिरोधक हटवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेट येथे वाहनांची संख्या वाढली आहे. काँग्रेस रोडमार्गे टिळकवाडीकडे जाणारी वाहतूक या मार्गाने जाते. बऱ्याच वेळा वाहनांची गती अधिक असल्यामुळे अपघात होत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी रेल्वे गेटच्या बाजूने गतिरोधक घालण्यात आला. गतिरोधक चुकीच्या पद्धतीने घालण्यात आल्याने वाहन चालकांना वाहने चालविताना अडथळे येत आहेत. काँग्रेस रोडमार्गे पहिले रेल्वेगेटकडे वाहने वळवितानाच गतिरोधक असल्याने वाहने अडकली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच वाढ होत असल्यामुळे अवैज्ञानिक पद्धतीने घातलेला गतिरोधक काढण्याची मागणी वाहन चालकांतून होत आहे.