रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर राज्यात अभूतपूर्व सुरक्षा
संवेदनशील, अतिसंवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
अयोध्येतील श्री राममंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून कडेकोट सुरक्षा व्यवस्था हाती घेण्यात आली आहे. बेंगळूरसह विविध जिह्यांमध्ये अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिरांसह शहरांतील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
अयोध्येत 22 जानेवारीला बालस्वरुप रामांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातचोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. या दिवशी कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला सुटी देऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. रजेवर असलेल्यांनीही या दिवशी सक्तीने ड्युटीवर हजर राहावे, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. या पूर्वी झालेल्या जातीय दंगलींची माहिती घेऊन पोलिसांची अशा दंगलींमध्ये सहभागी असणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे. याशिवाय समाजहिताला बाधा पोहोचविणाऱ्या समाजकंटकांच्या हालचालींवरही संबंधित पोलीस स्थानकांनी नजर ठेवली आहे.
तसेच पोलीस निरीक्षकांनी सर्व स्थानकांच्या हद्दीतील सर्व धर्माच्या नेत्यांना बोलावून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांच्या समाजातील नेत्यांना सल्ला देण्यासाठी शांतता बैठक घ्यावी, अशी सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 22 जानेवारी रोजी राज्यात कोणत्याही धार्मिक रॅलीला किंवा हजारो लोक एकत्र जमणाऱ्या मेळाव्याला परवानगी दिली जाणार नाही. जातीय सलोखा धोक्यात आणणाऱ्या कृत्यांबाबत अफवा पसरण्याच्या घटना घडू नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याचा आणि गरज भासल्यास विविध जिह्यांमधून पोलिसांना पाचारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंड्या रामनगर, चिक्कबळ्ळापूरसह किनारपट्टी भागात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आला असून अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.