असंघटित क्षेत्र : नवीन कामगार कायदे
असंघटित व्यवसाय क्षेत्र आणि त्यामध्ये काम करणारे कामगार आपल्याकडे अनेकार्थांनी नेहमीच चर्चेत राहतात. जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार आपल्याकडे प्रचलित अशा असंघटित क्षेत्र व त्यामध्ये काम करणाऱ्यांसाठी ‘इन्फॉर्मल एम्प्लॉयमेंट’ व ‘अनऑर्गनाईज्ड सेक्टर’ असा शब्दप्रयोग केला जातो. यामध्ये प्रामुख्याने कायमस्वरुपी अस्थायी काम करणाऱ्यांचा समावेश होतो.
आपल्याकडे ‘अनऑर्गनाईज्ड सेक्टर’ म्हणजेच असंघटित क्षेत्र या संकल्पनेला औपचारिक स्वरुप मिळाले ते ‘नॅशनल कमिशन फॉर एंटरप्रायझेस इन दि अनऑर्गनाईज्ड सेक्टर’ (एनसीईयूएस)मुळे. यामध्ये तत्कालीन धारणेनुसार विशेषत: खासगी क्षेत्र वा उद्योगातील व वैयक्तिक मालकीच्या उद्योग व्यवसायांमध्ये काम करणाऱ्यांचा समावेश करण्यात आला. त्यावेळी प्रचलित प्रथेनुसार ज्या उद्योगात 10 पेक्षा कमी कामगार आहेत अशा उद्योगांचा समावेश असंघटित उद्योग क्षेत्रात होऊ लागला. रोजंदारीवर काम करणाऱ्यांपासून स्वयंरोजगार वा छोटेखानी व्यावसायिकांचा पण असाच नामोल्लेख होत गेला.
या परंपरागत व धोरणात्मक पार्श्वभूमीवर देशांतर्गत असंघटित क्षेत्र व त्यामध्ये काम करणाऱ्यांच्या संदर्भात सरकारने पारित केलेल्या केंद्रिय कामगार कायदे व त्या अंतर्गत राज्य स्तरावरील प्रचलित वा प्रस्तावित कामगार विषयक नियमांमुळे काय बदल अपेक्षित आहे याचा मागोवा घेणे आवश्यक ठरते. माजी केंद्रिय कामगार मंत्री रविंद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या राष्ट्रीय श्रम आयोगाला असंघटित क्षेत्रातील कामगारांना काही प्रमाणात तरी संरक्षण प्रदान करण्यासाठी कायदेशीर तरतुदींबद्दल सूचित करण्यास सांगण्यात आले होते. वर्मा आयोगाने 29 जून 2002 रोजी सादर केलेल्या आपल्या अहवालात असंघटित क्षेत्रातील कामगारांना विविध स्तरांवर संरक्षण प्रदान करणाऱ्या समावेशक कायदेशीर तरतुदींची शिफारस केली. या तरतुदींमध्ये प्रामुख्याने या कामगारांचे आरोग्य, बाळंतपणाची रजा, अपघात प्रकरणी भरपाई, भविष्य निर्वाह निधी व वृद्धापकालीन निवृत्तीवेतन मिळावे, अशी शिफारस केली होती.
या पार्श्वभूमीवर व प्रदीर्घ काळानंतर केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 रोजी लागू केलेले चार प्रमुख कामगार कायदे व त्याअंतर्गत 8 मे 2026 रोजी घोषित केलेले या कामगार कायद्यांशी संबंधित नियमांचा पडताळा घेता नवे कामगार कायदे व नियम या दोन्हीमध्ये असंघटित क्षेत्रातील उद्योग-व्यवसाय व त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा मर्यादित स्वरुपात विचार झाल्याचे दिसून येते.
उदाहरणार्थ सद्यस्थितीत असंघटित क्षेत्रात कामगारांना देय असणारे वेतन व अतिरिक्त कामांसाठीची रक्कम प्रामुख्याने रोख स्वरुपात देण्यात येते. त्यामुळे या कामगारांना देय असणारी व प्रत्यक्षात दिली जाणारी रक्कम याचा तपशील कळणे वा समजणे अवघडच नव्हे तर प्रसंगी अशक्य होत असे. नव्या वेतनविषयक नियम, 2019 नुसार प्रत्येक व्यवस्थापन व नियोक्त्याने कामगारांना निर्धारित वेतन देणे बंधनकारक करण्यात आले असले तरी हे वेतन रोख वा बँक खात्यात जमा करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्याची तरतूद करण्याचे अधिकार राज्य सरकारवर सोपविण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकार व त्यांच्या नियमांनुसारच हे फायदे प्रत्यक्षात मिळू शकतील.
असंघटित क्षेत्रातील कामगारांना नव्या कामगार कायदे व त्याअंतर्गत मिळणारे वा प्रस्तावित फायदे याच्याच जोडीला केंद्र सरकार स्तरावर इतर काही फायदे व योजनांचा लाभ होऊ शकतो. त्यांचा संक्षिप्त तपशील पुढीलप्रमाणे-
प्र्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना- यामध्ये अपघाती मृत्यू अथवा अपंगत्वासाठी 2 लाख रुपये तर अंशत: अपंगत्वासाठी 1 लाख रुपयांची रक्कम मिळू शकते. यासाठी वार्षिक 20 रु. विमाच्या हप्त्यापोटी भरावे लागतात. उपलब्ध आकडेवारीनुसार 2015 मध्ये सुरु झालेल्या या विमा योजनेमध्ये आजवर 580 दशलक्ष कामगारांची नोंदणी झाली आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना- या योजनेअंतर्गत वार्षिक 436 रु. विमा हप्ता भरल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला त्याच्या मरणोत्तर 2 लाख रुपयांची रक्कम मिळू शकते. उपलब्ध आकडेवारीनुसार सद्यस्थितीत या योजनेमध्ये 267 दशलक्ष जणांची नोंदणी आजवर झाली आहे.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना- ही योजना मासिक 15,000 रु. वेतन मिळविणाऱ्यांसाठी लागू आहे. योजनेंतर्गत 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींनी दरमहा 55 ते 200 रु. भरल्यास त्यांच्या एकत्रित रकमेएवढी रक्कम शासनातर्फे दिली जाते व अशा व्यक्तींनी वयाची 60 वर्षे करणाऱ्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना योजनेंतर्गत दरमहा 3000 रु. पेन्शन देय असते. उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या या पेन्शन योजनेचा लाभ सुमारे 5 दशलक्ष जणांना मिळत आहे.
केंद्र सरकारच्या पुढाकारातून ‘ई-श्रम पोर्टल’ या संगणकीय पद्धतीद्वारा असंघटित क्षेत्रात काम करण्याची नोंदणी व्यापक स्तरावर करण्यात आली. त्याद्वारे सुमारे 300 दशलक्ष कामगारांनी आजवर नोंदणी केली आहे. अशांना विशेष खाते क्रमांक देण्यात येऊन मृत्यू अथवा कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये तर तात्पुरत्या अपंगत्वासाठी 1 लाख रुपये देय असतात.
नव्या कामगार कायद्यांच्या प्रस्तावित स्वरुपात व विशेषत: 2020 च्या सामाजिक सुरक्षा कायद्यामध्ये पण असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अपेक्षित तरतुदी प्रस्तावित करण्यात आलेल्या नाहीत ही बाब चिंतनीय आहे. राज्य स्तरावर नव्या कामगार कायद्यांतर्गत राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड व तेलंगण यासारख्या राज्यांनी राज्यातील असंघटित कामगारांसाठी काही प्रमाणात पुढाकार घेतला असला तरी त्यावर अधिक विचारपूर्वक व व्यापक उपाय-योजनांची वेळेत साथ मिळणे आवश्यक आहे.
दत्तात्रय आंबुलकर
