33 ग्राम पंचायतींवर बिनविरोध निवड
14 ग्राम पंचायतींमध्ये होणार पोटनिवडणूक
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्ह्यातील एकूण 46 ग्राम पंचायतींमध्ये रिक्त असलेल्या 48 जागांपैकी 33 ग्राम पंचायतींमध्ये बिनविरोध निवड झाली आहे. तर खानापूर तालुक्यातील गुंजी ग्राम पंचायतमध्ये उमेदवारी अर्जच दाखल झाला नाही. उर्वरित 14 जागांसाठी प्रत्यक्ष पोटनिवडणूक होणार आहे. माघारीचा दिवस शुक्रवारी संपला असून लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 14 जागांसाठी आता चुरशीने लढत होणार आहे.
विविध कारणांनी रिक्त झालेल्या ग्राम पंचायत सदस्यांच्या जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक होत आहे. एकूण 48 जागांसाठी तब्बल 95 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी शुक्रवारी काहींनी माघार घेतल्याने 33 ग्राम पंचायतींवर बिनविरोध निवड झाली आहे. तर 14 जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे.
पोटनिवडणूक होणाऱ्या ग्राम पंचायती
बस्तवाड, बेकिनकेरे, कंग्राळी खुर्द (अलतगा), चंदूर, नाईंग्लज, निडगुंदी, अरताळी, मरकट्टी, हिरेकुंभ, कोगनोळी, संडूर, बिडी, जांबोटी, हलशी आदी ग्राम पंचायतींमध्ये प्रत्येकी एक जागेसाठी दि. 23 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
बिनविरोध ग्राम पंचायती
मारिहाळ, होनगा, बेनकनहळ्ळी, संतिबस्तवाड, कंग्राळी खुर्द, मावनूर, घोडगेरी, शिरढाण, गुडस, केरुर, चंदूर, करोशी, नेज, शिरुर, शिरहट्टी, उडीकेरी, हण्णीकेरी, व्हनूर, गेवनकोप, हिरेकोप के. एच., कंदापूर, उदपुडी, गोडची, घटकनूर, मंगसुळी, मोळे, मुन्याळ, यादवाड, यमगर्णी, हिरेमुनवळी, इटगी, घोडगाळी, नंदगाव या ग्राम पंचायतींमधील रिक्त जागांवर सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर खानापूर तालुक्यातील गुंजी ग्राम पंचायतीमध्ये उमेदवारी अर्जच दाखल झाला नाही.
ग्राम पंचायतींचा केवळ एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे 48 जागांपैकी बहुतांशी ग्राम पंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुकीला पाठिंबा देण्यात आला आहे. केवळ 14 ग्राम पंचायतींमध्येच निवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. येत्या 23 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 यावेळेत निवडणूक प्रक्रिया चालणार आहे.