उन्नती हुडाचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/बिजिंग
मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या चीन मास्टर्स सुपर 750 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडाचे महिला एकेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. तसेच पुरुष दुहेरीत भारताच्या एम.आर. अर्जुन आणि हरिहरण अंशकरुणन यांना निवृत्त व्हावे लागले. महिला एकेरीतील खेळविण्यात आलेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात दक्षिण कोरियाच्या 12 व्या मानांकीत किम युएनने भारताच्या उन्नती हुडाचा 21-10, 21-18 अशा गेम्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. दरम्यान पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामना भारताचा हरिहरन आणि अर्जुन तसेच चीनच्या चेन यांग व लियु यी यांच्यात खेळविला गेला. या लढतीतील पहिल्या गेममध्ये चीनची जोडी 11-8 अशी आघाडीवर असताना भारतीय जोडीने माघार घेतली. माघार घेण्याचे कारण मात्र निश्चित समजू शकले नाही.