रातोरात मळणी करून पळविले भात
कापलेल्या भाताची चोरी : 15 पोती भात लंपास केल्याने नुकसान
वार्ताहर/मजगाव
मच्छे येथील शेतकरी सिद्धाप्पा बसवंत गिऱ्याळकर यांनी सुमारे अर्धा एकरमधील भाताची कापणी करून वळी घालून ठेवली होती. परंतु मंगळवारी रात्री अज्ञातांनी सदर भाताची ट्रॅक्टरच्या साहाय्याने मळणी करून सुमारे 15 पोती भात पळविल्याची घटना बुधवार दि. 27 रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत समजलेली माहिती अशी, सिद्धाप्पा गिऱ्याळकर या शेतकऱ्याने आपल्या शेतातील भाताची कापणी करून वळी घालून ठेवण्यात आली होती. मात्र, बुधवारी सकाळी शेताकडे गेल्यानंतर शेतातील भाताची मळणी करून भात पळविल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. यावेळी लागलीच शेजारील शेतकरी जमा झाले व अज्ञात चोरट्यांनी रात्री भात घेवून गेल्याचे निदर्शनास आले. गिऱ्याळकर यांनी बुधवारी दुपारी ग्रामीण पोलीस स्टेशन वडगाव येथे रितसर चोरीची तक्रार नोंदविली आहे. पोलीस पुढील तपास करीत असून सदर भात चोरीच्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलिसांच्या सहकार्याने शेतवडीतही गस्त घालण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.