सावंतवाडीत अज्ञातांनी उभारला छ. संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा
सावंतवाडी । प्रतिनिधी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन शनिवारी २९ मार्च रोजी आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी जेलच्या पाठीमागील छत्रपती संभाजी चौक येथे शुक्रवारी पहाटे अज्ञातांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. याची माहिती मिळताच सकाळपासूनच छत्रपती संभाजी महाराज प्रेमी घटनास्थळी भेट देत याचे स्वागत करताना आनंद व्यक्त करत आहेत.दरम्यान गेले महिनाभर याच ठिकाणी दररोज सायंकाळी ७:३० ते ८ च्या वेळेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या प्रेरणास्थानावर बलिदान मास दिनानिमित्त प्रार्थना सुरू आहे. याचा समारोप शनिवारी २९ मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा पूर्णाकृती पुतळा उभारल्याने याची चर्चा सावंतवाडी शहरात सुरू आहे. मात्र हा पुतळा कोणी उभारला याची निश्चित माहिती नाही. दरम्यान पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.