For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरुड येथे अज्ञाताकडुन गाईचा पाय तोडण्याचा प्रयत्न : माणूसकीला काळीमा फासणारी घटना

03:31 PM Feb 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
सरुड येथे अज्ञाताकडुन गाईचा पाय तोडण्याचा प्रयत्न   माणूसकीला काळीमा फासणारी घटना
Advertisement

सरुड : वार्ताहर

Advertisement

सरुड ( ता . शाहूवाडी ) येथे बिरदेव माळ परिसरात बाळासो बापू कांदेकर यांच्या मालकीच्या गाईचा अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करत पाय तोडण्याचा प्रयत्न केला आहे . यामध्ये गाई गंभीर जखमी झाली आहे . माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे शेतकरी वर्गातुन तीव्र संताप व्यक्त होत आहे . गेल्या वर्षभरापासून या परिसरात विकृत मनोवृत्तीतुन अज्ञात माथेफिरुकडुन जनावरांच्यावर धारदार शस्त्राने अमानुष्यपणे हल्ले होत आहेत. यापुर्वीही कांदेकर यांच्याच दोन गाईंचे कान कापण्यात आले होते . तर दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात जयसिंग पाटील यांच्या शर्यतीतील बैलाचा पाय तोडण्यात आला होता.

याबाबत अधिक माहिती अशी सोमवारी दुपारी बाळासो कांदेकर हे आपल्या शेतात गेले होते . याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने कांदेकर यांच्या जनावरांच्या शेडचे कुलुप तोडून शेडमध्ये असलेल्या गाईच्या पुढील पायावर धारदार शस्त्राने वार केला . हा वार खोलवर वर्मी लागल्याने गाईच्या पायातुन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. दोन महिन्यापूर्वी याच गाईच्या पुढील पायावर वार करण्याचा प्रयत्न केला होता . शेतातील काम आटोपून बाळासो कांदेकर हे शेडमध्ये आले असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला . यावेळी त्यांनी त्वरीत पोलिसांशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली . पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली . यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी जनावरांच्यावर हल्ले करणाऱ्या माथेफिरु आरोपीचा पोलिसांनी त्वरीत छडा लावुन त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्याकडे केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.