विद्यापीठाचे 600 कोटीच्या अंदाजपत्रकात 5 कोटीची तूट
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत शैक्षणिक वर्ष 2024-25 चे 600 कोटी 10 लाखाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यात अपेक्षित खर्च 605 कोटी 71 लाख असून 5 कोटी 60 लाख रूपयांची तूट विद्यापीठाच्या निधीतील शिल्लकेतून भरून काढली जाणार आहे. अधिसभा सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले यांनी हे अंदाजपत्रक सादर केले. हे अंदाजपत्रक विद्यार्थी केंद्रीत व संशोधनाला चालना देणारे व नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत आहे. अधिसभा सदस्यांनी एक तास चर्चा करून अखेर एकमताने मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. तर सचिवपदी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते.
डॉ. रघुनाथ ढमकले यांनी ऑनलाईन पध्दतीने वार्षिक अंदाजपत्रकाचे सादरीकरण केले. अधिसभा सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात अंदाजपत्रकाचे स्वागत केले. परंतू संजय परमने, अभिषेक मिठारी, डॉ. प्रकाश पवार, श्वेता परूळेकर, श्रीनिवास गायकवाड, आदींनी अर्थसंकल्पातील त्रुटींवर बोट ठेवले. जमा होणारे पैसे व सादर केलेल्या बजेटमध्ये तफावत असल्याचे दाखवून दिले. तसेच शिक्षण आणि संशोधनावर फक्त 13 कोटीची तरतूद का केली असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर सेवानिवृत्त व मयत शिक्षक, कर्मचाऱ्यांना दिलेली रक्कम कशी वसुल करता असा सवाल उपस्थित करून विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. यावर कुलगुरू डॉ. शिर्के व डॉ. ढमकले यांनी समर्पक उत्तरे दिली. अंदाजपत्रकातील चांगल्या तरतूदी व तूटीवर चर्चा करून एकमताने अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.
शासकीय विभागासाठी 55 कोटी 72 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये शास्त्र अधिविभाग 7 कोटी 44 लाख, इतर अधिविभाग 7 कोटी 17 लाख, विविध सेवा व इतर उपक्रम 52 कोटी 99 लाख असा विद्यापीठाच्या स्वनिधीमधील 123 कोटी 32 लाख खर्च अपेक्षित आहे. वेतन अनुदान खर्च 157 कोटी 48 लाख, विविध वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या निधीमधून खर्चासाठी 13 कोटी 15 लाख, संशोधन व विकास निधी 42 कोटी 23 लाख, घसारा निधी 16 कोटी 51 लाख, निलंबन लेखे 253 कोटी 1 लाख अशी 605 कोटी 70 लाखाची खर्चासाठी तरतूद प्रस्तावित आहे. तसेच मेरीट स्कॉलरशिपसाठी 60 लाख, दिव्यांगासाठी 2 कोटी 50 लाख, इनोवेशन आणि इन्क्युबेशनसाठी 28 लाख 2 हजार, पीएम उषा अंतर्गत 2 कोटी 16 लाख, दूरशिक्षण व ऑनलाइन केंद्रांतर्गत डिजिटल आणि ऑनलाइन शिक्षणाकरिता 1 कोटी 4 लाख, वाणिज्य व व्यवस्थापन इमारतीचे बांधकामासाठी 6 कोटी 39 लाख, त्यापैकी सन 2024-25 मध्ये 4 कोटी इतका खर्च झालेला आहे. युथ हॉस्टेलसाठी 3 कोटी, क्रीडा वसतिगृहासाठी 3 कोटी, महाराष्ट्र शासनाकडून दिलेल्या 8 कोटी 48 लाख 81 हजार 945 रुपयांच्या निधीमधून भुयारी मार्गाचे काम पूर्ण केले आहे. संख्याशास्त्र अधिविभागासाठी 50 लाख तरतूद केली असून हॉलचे काम पूर्णत्वाकडे आहे. यंदा नव्याने विद्यार्थी विकास केंद्राचे जवळपास 10 कोटीचे तर क्रीडा विभागाचे 10 कोटीचे स्वतंत्र अंदाजपत्रक मांडण्यात आले.
- अपेक्षित जमा खर्च
सन 2025-2026 या वर्षात प्रशासकीय विभागांकडून 46 कोटी 18 लाख, शास्त्र अधिविभागांकडून 5 कोटी 32 लाख, इतर अधिविभागांकडून 3 कोटी 42 लाख जमा होण्याची अपेक्षा आहे. इतर उपक्रमांमधून 35 कोटी 31 लाख असे एकूण 90 कोटी 23 लाख विद्यापीठाच्या स्वनिधीत जमा अपेक्षित आहे. वेतन अनुदानापोटी शासनाकडून 152 कोटी 50 लाख, संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी 25 कोटी 51 लाख जमा अपेक्षित आहे. संशोधन व विकास निधीतून 42 कोटी 23 लाख रक्कम व घसारा निधीच्या शिल्लक रक्कमेतून 16 कोटी 51 लाख रक्कम जमा होणे प्रस्तावित केलेली आहे. निलंबन लेख्यांमधून 273 कोटी 12 लाख असे 600 कोटी 10 लाख जमा होणे अपेक्षित आहे.
- खर्चासाठी केलेली तरतूद
प्रशासकीय विभाग 55 कोटी 72 लाख, शास्त्र अधिविभाग 7 कोटी 44 लाख, इतर अधिविभाग 7 कोटी 17 लाख, विविध सेवा व इतर उपक्रम 52 कोटी 99 लाख असा विद्यापीठाच्या स्वनिधीमधील 123 कोटी 32 लाख खर्च अपेक्षित आहे. वेतन अनुदान खर्च 157 कोटी 48 लाख, तर विविध वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या निधीमधून खर्चासाठी 13 कोटी 15 लाख तसेच संशोधन व विकास निधी 42 कोटी 23 लाख व घसारा निधी 16 कोटी 51 लाख, निलंबन लेखे 253 कोटी 01 लाख अशी 605 कोटी 70 लाखाची खर्चासाठी तरतूद प्रस्तावित आहे.
- अधिसभा सदस्यांच्या मागण्या
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अनेक महाविद्यालय स्वायत्त झाल्यामुळे विद्यापीठ निधीवर भार पडत आहे. इतर तरतूदीचा विचार करावा. डीओटी व कम्युनिटी रेडिओच्या विद्यार्थी संख्या वाढीसाठी जाहिरात करावी. पर्यावरण पूरक विद्यापीठासाठी तरतूद केल्याबद्दल अभिनंदन केले. आमदार, खासदार व सीएसआर फंडातून पैसे मिळवावेत, तसेच खेळाडूंना दैनंदिन भत्ता वाढ देण्यासाठी आर्थिक तरतूद करावी. संशोधक विद्यार्थी 10 टक्के असल्याने विद्यार्थी संख्या वाढीनुसार पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयांसाठी आर्दाक तरतूद करावी.