मीराबाग येथे एकजूट‑सत्याचा विजय !
आंदोलनाच्या 49 व्या दिवशी बंधारा रद्द करण्याची घोषणा : निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांसह समर्थकांचे मानले आभार
कुडचडे : गेल्या 49 दिवसांपासून मीराबाग-सावर्डे येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला अखेर काल सोमवारी मोठे यश आले. मीराबाग येथे प्रस्तावित असलेला बंधारा आणि त्याच्याशी संबंधित सर्व प्रकल्प रद्द करण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मडगाव येथील मोती डोंगर सरकारी सभागृहात आंदोलकांसमोर बोलताना दिले. या निर्णयामुळे मीराबागच्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, हा सत्याचा आणि एकजुटीचा विजय असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
या आंदोलनाचा कालचा 49 वा दिवस अत्यंत नाट्यामय ठरला. आंदोलकांनी पणजीतील आझाद मैदानावर कूच करण्याची तयारी केली होती, परंतु फोंडा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर भारतीय न्याय संहितेचे 163 कलम रविवारी रात्री उशिरा लागू करण्यात आल्याने खळबळ माजली. सकाळी 8 वाजता पणजीला जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी मीराबागमध्येच अडवले. या दडपशाहीचा निषेध करत आंदोलकांनी रस्त्यावरच ठाम मांडले आणि रस्ता रोखला. विशेष म्हणजे, आंदोलकांनी दुपारचे जेवणही भररस्त्यात बसून घेतले, ज्याचे पडसाद समाज माध्यमांवर उमटले आणि सरकारवर टीकेची झोड उठली.
मुख्यमंत्री, आंदोलकांमध्ये चर्चा
माजी आमदार दीपक पाऊस्कर यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून परिस्थितीची तीव्रता सांगितली. सुऊवातीला मुख्यमंत्र्यांनी तोंडी आश्वासन दिले, परंतु आंदोलक लेखी आश्वासनावर ठाम राहिले. अखेर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना मडगाव येथे चर्चेसाठी बोलावले. तिथे त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री या नात्याने आपण मीराबाग येथील बंधारा व संबंधित सर्व प्रकल्प रद्द करत असून, संबंधित फाईलवर तसे नमूद करण्यात येईल, असे सर्वांच्या समक्ष सांगितले.
मुख्यमंत्री, आंदोलकांचे आभार : पाऊसकर
सावर्डेचे माजी मंत्री दीपक पाऊस्कर यांनी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी शब्दाला जागून योग्य निर्णय घेतल्याबद्दल आपण त्यांचा आभारी आहे. तसेच संयम राखल्याबद्दल आंदोलकांचेही त्यांनी आभार मानले आहेत. जनतेसाठी निर्णय घेण्यासाठी सरकारला 49 दिवस लागले हे दुर्दैवी आहे. जनतेमुळेच सरकार स्थिर असते, हे विसरता कामा नये, असा टोला मेशू डिकॉस्ता यांनी आपले मत व्यक्त करताना लावला.
महिलांचा देवावर पूर्ण विश्वास
आज आम्ही गाव वाचविण्यासाठी येथे घर सोडून बसलो होतो. त्याचे फळ आम्हाला देवाने दिलेले आहे. यापुढे गावावर कोणतेही संकट आले तर आम्ही ते संकटाची हकालपट्टी करण्यास कोणत्याही क्षणी उभे राहणार, अशी ठाम उत्तरे महिला आंदोलकांनी यावेळी दिली. या आंदोलनाच्या 49 व्या दिवशी सावर्डेचे माजी सरपंच संदीप पाऊस्कर जे आंदोलकांना समर्थन देत होते त्यांचा आज 49 वा वाढदिवस असल्यामुळे संध्यकाळी सर्व आंदोलकांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. गावातील युवकांनी व ज्येष्ठांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. महिलांनी फुगडी व देवस्तुती गाणी म्हणून आनंद व्यक्त केला. यावेळी आंदोलकांना फोनवरून गोवाभरातून या यशाबदल शुभेच्छा देण्यात येत होत्या.
पणजीत सरकारवर टीका
दरम्यान, मीराबाग येथील लोक बंधाऱ्याच्या प्रश्नावर पणजीत आझाद मैदानावर येऊन आवाज उठवणार म्हणून सरकारने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचा निर्णय लोकशाहीचा खून करणारा असल्याची टीका आरटीआय कार्यकर्त्यांनी नोंदवली आहे. सोमवारी सकाळी मीराबागचे लोक पणजीत येऊन आझाद मैदानावर आंदोलन करणार होते आणि आवाज उठवणार होते. त्यांचा आवाज दडपून टाकण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहिता कलम 163 अंतर्गत जमावबंदी आणि प्रतिबंधात्मक आदेश जारी केला.
शिवाय आझाद मैदानाभोवती मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि मैदानाचे चारही दरवाजे बंद करण्यात आले. या प्रकाराचा विरोधी पक्षनेते तसेच विविध संघटनांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. मीराबागच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर अनेक समाज कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी जमले होते. त्यांनी या प्रकाराबाबत संताप वर्तवला. दरम्यान, मीराबागच्या आंदोलकांना पणजीत येऊ दिले नाही आणि त्यांना वाटेवरच अडवण्यात आले. आंदोलनासाठी पणजीचे आझाद मैदान खुले ठेवणाऱ्या सरकारने आयत्यावेळी आंदोलकांची गळचेपी केली म्हणून टीका करण्यात येत आहे.
आमच्या चार मागण्या मान्य : उपेंद्र नाईक
आंदोलनाचे नेतृत्व करणारे उपेंद्र नाईक यांनी सांगितले की, मीराबागवर आलेला ‘बंधाऱ्याचा नरकासुर’ आज मुख्यमंत्र्यांनी कायमचा गाडून टाकला आहे. आम्ही माहिती अधिकारांतर्गत या निर्णयाची अधिकृत प्रत मागवून त्याची सत्यता पडताळून पाहू, मुख्यमंत्र्यांकडून मान्य झालेल्या चार मागण्या.
- बंधारा व संबंधित प्रकल्प रद्द.
- बेकायदेशीरपणे मारलेले खड्डे बुजविणार.
- चार आंदोलकांवरील पोलिस तक्रारी मागे घेणार.
- प्रलंबित डांबरीकरणाचे काम पूर्ण करणार.
हा मीराबागचा पुनर्जन्म : आपा नाईक
आज जो निर्णय झाला आहे, तो मीराबाग गावाचा पुनर्जन्म आहे. श्री काळे म्हारू देवाच्या कृपेने आणि सर्व समर्थक त्यात काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई, आपचे कार्यकर्ते, चिंबल गावचे लोक, रामा काणकोणकर, महिला संस्था, प्रसारमाध्यमे व पोलिसांच्या सहकार्याने हा लढा यशस्वी झाला. याबद्दल आपण आभार व्यक्त करतो, असे ज्येष्ठ आंदोलक आपा नाईक यांनी सांगितले.