एकता अन् विविधता हीच भारताची राष्ट्रीय भाषा
स्पेनमध्ये द्रमुक खासदार कनिमोझी यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ माद्रिद
भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या द्रमुक खासदार कनिमोझी यांनी भारताची राष्ट्रीय भाषा ही एकता अन् विविधता असल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटले आहे. भारताच्या एकतेचा संदेश जगाला देण्यासाठी हे शिष्टमंडळ आले असल्याचे उद्गार कनिमोझी यांनी स्पेन येथे काढले आहेत.
भारताची राष्ट्रीय भाषा कोणती असा प्रश्न कनिमोझी यांना स्पेनमध्ये विचारण्यात आला होता. याच्या उत्तरादाखल कनिमोझी यांनी भारताची राष्ट्रीय भाषा ही एकता अन् विविधता असून हाच आवश्यक संदेश जगापर्यंत पोहोचविला जावा असे म्हटले आहे. अलिकडेच तामिळनाडूतील द्रमुक सरकारने केंद्र सरकारचे नवे राष्ट्रीय धोरण 2020 मध्ये सामील तीन भाषा सूत्राला विरोध केला होता, या पार्श्वभूमीवर द्रमुकच्या खासदार कनिमोझी यांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण ठरले आहे.
स्पेनच्या विदेश मंत्र्यांची घेतली भेट
स्पेनमध्ये कनिमोझी यांच्या नेतृत्वात भारताचे शिष्टमंडळ स्पेनचे विदेशमंत्री जोसे मॅन्युएल अल्बारेस यांना भेटले. या भेटीत भारतीय शिष्टमंडळाने दहशतवाद विरोधातील भारताची लढाई आणि 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या भूमिकेची माहिती स्पेनला दिली, असे भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले. दहशतवाद विरोधी लढाईत स्पेन पूर्णपणे भारतासोबत उभा आहे. दहशतवाद कधीच विजयी होऊ शकत नसल्याचे विदेशमंत्री अल्बारेस यांनी म्हटले आहे.
दहशतवाद पीडितांशी साधला संवाद
शिष्टमंडळाने स्पेनमध्ये ‘असोसिएशन ऑफ व्हिक्टिम्स ऑफ टेररिजम’ संस्थेला भेट दिली. ही संस्था जगभरात दहशतवादाने पीडित 4 हजार लोकांहून अधिक लोकांसोबत काम करते आणि त्यांना मानसिक आणि सामाजिक मदत पुरविते. या चर्चेत भारत आणि स्पेन दोन्ही देशांनी स्वत:चे अनुभव मांडले आणि पीडितांच्या मदतीसाठी अवलंबिण्यात येणाऱ्या पद्धतींवर चर्चा केली आहे.