फिनलंडमध्ये 1500 फूट खोलवर अनोखे भुयार
फिनंलडने जमिनीखाली सुमारे 1500 फुटांचे एक भुयार निर्माण केले असून ते एक लाख वर्षांसाठी बंद केले जाणार आहे. प्रत्यक्षात हे भुयार आण्विक कचऱ्यासाठी जगातील पहिले स्थायी भांडार स्थळ असेल. हे फिनलंडच्या यूरोजोकीमध्ये निर्माण करण्यात आले असून त्याला ओंकालो नाव देण्यात आले आहे. आण्वि कचऱ्याच्या हाताळणीसाठी फिनंलडने उचललेल्या या पावलाला ऐतिहासिक संबोधिण्यात येत आहे. अनेक अन्य देश देखील अशाप्रकारचे पाऊल उचलू शकतात. फिनलंडचे हे भूमिगत भुयार 1480 फूट खोल आहे. पुढील वर्षापासून 1 लाख वर्षांपर्यंत यात कुठलाही मनुष्य प्रवेश करू शकणार नाही. हे भूयार पूर्णपणे बंद केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 860 दशलक्ष पाउंड इतका खर्च आला आहे. ओंकालोला आण्विक कचऱ्याच्या निचऱ्यासाठी आदर्श स्थळ मानले जात आहे. ही पृथ्वीच्या खोलवर धोकादायक आण्विक कचऱ्याला सुरक्षितपणे संग्रहित करण्याची नवी पद्धत आहे.
फिनंलडच्या या भूमिगत भुयाराला हजारो वर्षांपर्यंत किरणोत्सर्गी पदार्थांना वातावरणापासून दूर ठेवता येईल अशाप्रकारे डिझाइन करण्यात आले आहे. यामुळे आगामी पिढ्या आणि पर्यावरणाची सुरक्षा सुनिश्चित होणार आहे. ओंकालोच्या निर्मितीत प्रगत इंजिनियरिंग आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. किरणोत्सर्गी पदार्थ बाहेर पडू नयेत यासाठी अनेक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प आण्विक कचऱ्याच्या निराकरणासाठी एक दीर्घकालीन आणि सुरक्षित पद्धत प्रदान करतो. अनेक अन्य विकसित देखील हे तंत्रज्ञान अवलंबिण्यात रुची दाखवत आहेत.
एक किरणोत्सर्गी कचरा व्यवस्थापन कंपनी पोसिव ओए या प्रणालीची निर्मिती करत आहे. आण्विक कचऱ्याला कच्चे लोखंड आणि तांब्याच्या सिलेंडरमध्ये ठेवण्यात येणार आहे. मग बेंटोनाइट मातीत त्याला गुंडाळण्यात येईल. यानंतर भुयार मातीने भरले जाणार आहे. भुयाराच्या संरचना आणि आसपासच्या क्षेत्राला बंद करणारे सील लावले जाणार आहे.