पेन्सिलचे अनोखे दुकान
हजारो प्रकारच्या पेन्सिल उपलब्ध
मुलांना स्टेशनरीचे दुकान दिसल्यावर ते आईवडिलांकडे साहित्याची खरेदी करण्यासाठी हट्ट करू लागतात. परंतु इराणच्या तेहरानमध्ये एक दुकान आहे, जेथे केवळ पेन्सिल मिळतात. येथील पेन्सिलचे प्रकार पाहून मुलेच नव्हे तर त्यांचे पालकही थक्क होतात. अलिकडेच या दुकानाशी निगडित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तेहरानमध्ये एक 35 वर्षे जुने दुकान असून तेथे केवळ पेन्सिल मिळतात. सर्वसाधारणपणे पेन्सिल स्टेशनरीच्या दुकानात मिळते, जेथे अन्य सामग्रीही उपलब्ध होते. परंतु तेहरानमधील दुकानात केवळ पेन्सिल मिळतात. या दुकानात हजारो रंगीत पेन्सिल्स उपलब्ध आहेत. या पेन्सिल खरेदी करण्यासाठी लहान मुलांपासून प्रौढ लोकही गर्दी करत असतात. या दुकानाचे नाव मेदाद राफी असून मोहम्मद रफी हे दुकान चालवतात. 1990 मध्ये त्यांनी हे दुकान सुरू केले होते आणि तेव्हापासून ते तेहरान शहरात प्रसिद्ध झाले आहेत.
जग भले डिजिटल झाले असले तरीही रफी यांचे पेन्सिल प्रेम कमी झालेले नाही. आजही ते हजारो पेन्सिलने वेढलेल्या दुकानात बसलेले दिसून येतात. दुकानात किती पेन्सिल आहेत हे आता नेमकं सांगता येत नाही. परंतु प्रत्येक रंगाची सुमारे 200 शेड्स त्यांच्याकडे उपलब्ध आहे. ज्या लोकांना चित्रकामाची आवड आहे, असे लोक तेथे पेन्सिल खरेदी करण्यासाठी येत असतात. त्यांच्याकडे सुमारे 72 वर्षांपूर्वी निर्मित पेन्सिल देखील आहे. इन्स्टाग्रामवर रफी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला एक कोटीहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. अनेक लोकांनी यावर कॉमेंट देखील केली आहे.