Satara News | सुरक्षित वाहनचालनासाठी सातारा पोलीस दलाचे पाऊल; चालकांची आरोग्य तपासणी
सातारा -सातारा जिल्हा पोलीस दलातील वाहन चालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच सुरक्षित वाहनचालना सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पोलीस मोटार परिवहन विभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रिफ्रेशर कोर्सचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात जिल्ह्यातील एकूण १९४ पोलीस चालक सहभागी झाले असून त्यामध्ये ९ महिला चालकांचाही समावेश आहे.
शिबिरामध्ये चालकांची रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) तसेच संपूर्ण नेत्र तपासणी करण्यात आली. वाहन चालविताना दृष्टीदोषामुळे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेषतः डोळ्यांच्या तपासणीवर भर देण्यात आला. तपासणीत एखादा चालक वाहन चालविण्यास अयोग्य अथवा वैद्यकीयदृष्ट्या त्रुटी आढळल्यास त्यास कार्यकारी दलात पाठविणे किंवा पोलीस ठाण्यात नेमणूक देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंदे यांनी यावेळी दिली.
यासोबतच चालकांसाठी रिफ्रेशर कोर्सचेही आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये विविध शासकीय वाहनांची तांत्रिक माहिती, देखभाल, सुरक्षित वाहनचालना तसेच वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाविषयी संबंधित अभियंत्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात पोलीस रुग्णालय, शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय,कोडोली तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला. विशेष बाब म्हणजे चालकांच्या कुटुंबीयांचीही मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.