म्यानमार-भारत सीमेवर अनोखे घर
बेडरुमपासून किचनपर्यंत जाताच बदलतो देश
जर केवळ एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यामुळेच तुमचे नागरिकत्व बदलले आणि तुम्ही दुसऱ्या देशात पोहोचत असाल तर काय होईल याचा विचार करून पहा. हा प्रकार विचित्र वाटत असला तरी एकाठिकाणी हे घडत आहे.
जगातील एका कोपऱ्यात खरोखरच एक असे घर आहे, जे दोन देशांच्या सीमेवर निर्माण करण्यात आले आहे. हे घर अन्य कुठे नाही तर भारतातील राज्य नागालँडमध्ये आहे. नागालँडमधील हे घर लोंगवा नावाच्या गावात असून ते भारत आणि म्यानमारच्या सीमेवर उभारण्यात आले आहे. हे घर नागालँडच्या गावात असण्यासोबत शेजारी देश म्यानमारच्या सागांग राज्याचाही हिस्सा आहे. भारत-म्यानमारच्या सीमेवरील गावात असलेले हे घर तेथील प्रमुखाचे आहे. हे घर सीमेवर अशाप्रकारे निर्माण करण्यात आले आहे की घराचा किचन म्यानमारमध्ये येतो, तर याचा बेडरुम भारतात आहे.
या गावाला फ्री मूव्हमेंट रिजीम अंतर्गत एक विशेष दर्जा मिळाला आहे. यामुळे येथील रहिवाशांना दुहेरी नागरिकत्व राखण्याची अनुमती मिळाली आहे. या नियमामुळे दोन्ही देशांचे लोक सीमा ओलांडून परस्परांच्या सीमेत दाखल होऊ शकतात. खास बाब म्हणजे शाळा आणि ऑफिसपर्यंत जाण्यासाठी देखील लोकांना ही सीमा ओलांडावी लागते.