Kolhapur Round Table : श्रावण : धर्म, विज्ञान आणि पर्यावरणाचा अनोखा संगम
धर्मशास्त्रात श्रावणामध्ये कोणते धार्मिक विधी करायचे, ते सांगितले आहे
कोल्हापूर : श्रावण म्हणजे केवळ व्रत नव्हे, एक आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक जीवनशैली आहे. निसर्ग, आरोग्य, आध्यात्माची सांगड, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धार्मिक परंपरांचा अनोखा संगम श्रावण महिन्यात समाविष्ट आहे. याची जाणीव नव्या पिढीला करून देण्याची गरज मंगळवारी ‘राऊंड टेबल’मध्ये सहभागी मान्यवरांनी व्यक्त केली.
श्रावण महिना फक्त व्रतवैकल्ये आणि देवकार्य करण्याचा नाही तर श्रावणातील प्रत्येक कृतीला जसे धार्मिक अधिष्ठान आहे, तसेच ते शास्त्रीय आणि पर्यावरणीय आहे. धर्मशास्त्रात श्रावणामध्ये कोणते धार्मिक विधी करायचे, ते सांगितले आहे. आहार कोणता आणि कसा असावा, याची चौकटा घालून दिली आहे.
मन, शरीर, बुध्दी, कुटुंब, समाज आणि पर्यावरणाचा विचार करुन धार्मिक अंगाने आणि शास्त्रीय कारणाने एक प्रकारचा कृती कार्यक्रमच आखून दिला आहे. श्रावण म्हणजे वैज्ञानिक आणि धार्मिक संगम आहे, असे मत दै. ‘तरुण भारत संवाद’ मध्ये मंगळवारी आयोजित राऊंड टेबल चर्चासत्रात सहभागी मान्यवरांनी मांडले.
चर्चासत्रात शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरण विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रकाश राऊत, निसर्गमित्र संस्थेचे पर्यावरण अभ्यासक अनिल चौगले, आहारतज्ञ डॉ. श्रृती भोला आणि डॉ. प्रेरणा देवकाते, पुरोहित अमोध भागवत, मूर्तीशास्त्र अभ्यासक अॅङ प्रसन्न मालेकर, गृहिणी प्राची साळुंखे आणि रेणू बोडके सहभागी झाल्या.
गाडीची ऑईल बदली, पोटाची केव्हा?
वेळच्या वेळी वाहनांची ऑईल बदली केली जाते. परंतु स्वत:च्या शरीराकडे लोक दुर्लक्ष करतात. आरोग्यामध्ये एरंडालाही फार महत्व आहे. यापूर्वी पोट साफ होण्यासाठी एरंडाचे तेल पिले जात होते. एरंडाची झाडे कमी झाली आहेत. एरंडाचे संगोपन करण्याची गरज असल्याचे निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी सांगितले.
श्रावणात मांसाहार का टाळावा
श्रावणाला वैज्ञानिक आणि पौरीहित्य महत्व आहे. या महिन्यात पाऊस असतो. तर सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे लोकांची पचनसंस्था मंदावते. त्यामुळे या महिन्यांत मांसाहार टाळला पाहिजे. या महिन्यात गवतावर किड लागलेली असते. हे खाद्य बकऱ्यांनी खाल्लेले असते. त्यामुळे मांसाहार केल्यास आजारी पडण्याचा धोका असतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले.
रानभाज्यामध्ये व्हिटॅमीन, मिनरल्स
शेफू, केवडा, मुळा, या वेलवर्गीय भाज्यामध्ये व्हिटॅमीन, मिनरल्स असतात. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ नये म्हणून या भाज्यांना जेवणात प्राधान्य दिले जाते. मांसाहार बंद केल्यामुळे शरीरात प्रोटीन कमी पडू नयेत म्हणून हरभरा डाळीचा वापर केला जातो.
धार्मिक जोड दिल्यामुळेच अनुकरण
पावसाळ्यामध्ये वातावरणात आमुलाग्र बदल झालेले असतात. अशा स्थितीमध्ये पोषक आहार गरजेचा असतो. शाकाहारी जेवणात रानभाज्याचा समावेश असला पाहिजे. फळे खाणेही महत्वाचे असते. शेपू आणि मुळ्याच्या भाजीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लहान मुलांचा कल चटपटीत खाण्याकडे असतो. अशा वेळी श्रावणांत धार्मिक जोड दिल्यामुळेच पोषक आहार खाण्याचे अनुकरण होते.
तर पूर्वीसारखी स्थिती येईल
वातावरणातील बदलामुळे ऋतुमानात आणि निसर्गचक्रात बदल होत आहे. प्लास्टिकचा अतिवापर याला कारणीभूत आहे. परिणामी, तापमानात वाढ होत आहे. अवकाळी पाऊस येत आहे. धर्मशास्त्रानुसार सणवार योग्य पद्धतीने केले तर यावर नियंत्रण येऊन पूर्वी सारखी स्थिती येऊ शकेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
उपवासादिवशी राजगिरा लाडू खायला हवा
चंदगडसारख्या परिसरात आजही 16 प्रकारचे लाडू तयार केले जातात. उपवासाच्या पदार्थासाठी वापरला जाणारे खाद्य आपल्याच शेतात परसबागेत पिकवू शकतो. सक्रांतीला तिळगूळच वाटले पाहीजे, घरात तयार केलेला किंवा चांगला गुळ आणि तीळच वाटले पाहिजे, साखरेपासून तयार केलेले तीळगूळ खाल्यास शरीरातील साखर वाढू शकते.
नागपंचमी नव्हे ही सर्पपंचमी असायला हवी
नागपंचमीला नागच नाही तर सर्व प्रकारच्या सर्पांची पुजा केली पाहिजे. या महिन्यात याच काळात उंदरांची संख्या वाढते. भारतातील पिकवलेल्या अन्नापैकी 26 टक्के अन्नाची नासाडी उंदिर करतात. त्यांच्यापासून धान्य वाचावे, यासाठी सर्व प्रकारच्या सर्पांचा उपयोग पडतो, म्हणून नागपंचमी साजरी केली जाते.
घे वाण दे वाण
महिलांच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात वाण देणे- घेणे असे कार्यक्रम केले जातात. पुर्वी हाच सण बियांची देवाण-घेवाण करण्यासाठी केला जात होता. पिकांच्या उत्पन्नासाठी बियाणांची देवाण- घेवाण मोठ्या प्रमाणात केली जात होती. सध्या वाण बाजूला गेले, इतर वस्तूंची देवाण-घेवाण भेटवस्तू दिली जाते.
संधीचे सोने करावे
सणामुळे कुटूंब एकत्र येते. वातावरण प्रसन्न असते. श्रावणांत विविध सण असतात. या निमित्ताने कुटूंब एकत्र येते. परिसरातील महिलाही मंगळागौरीच्या माध्यमातून एकत्र येतात. या संधीचे प्रत्येकाने सोने केले पाहिजे, यातून संवाद वाढून नाती दृढ होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कर्नाटकातील बेल वापरण्याची वेळ
मनुष्य आणि प्राण्यासाठी बेल हा महत्वाचा आहे. धार्मिकेतची जोड देत श्रावण महिन्यांत महादेवाला बेल वाहिला जातो. कोल्हापुरात गल्लीबोळात महादेव मंदिरे आहेत. परंतु कोल्हापुरात बेलाची झाडे शिल्लक राहिलेली नाहीत. कर्नाटकातून बेल येत आहे. बेलबाग बेलासाठी प्रसिद्ध होती. तेथेही आता बेलाची झाडे उरलेली नाहीत. नव्याने येथे 100 झाडे लावली आहेत. त्यांची पूर्ण वाढ होण्यासाठी अवधी लागणार आहे.
पावसाळ्यात मांसाहार टाळणे योग्यच
पावसाळ्यात दमट हवामानामुळे विविध प्रकारच्या विषाणूंचा प्रसार झपाट्याने होत असतो. हे विषाणू कोणत्याही पदार्थांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करू शकतात. विशेषत: मांसाहारातून याचा प्रसार अधिक होण्याचा धोका असतो. त्याचबरोबर पचनशक्तीही कमी झालेली असते. अशावेळी जड पदार्थांचे व्यवस्थित पचन न झाल्यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. पावसाळ्यात माशांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे पावसाळ्यात मांसाहार टाळणे योग्यच ठरते.
आंबट, तिखट, तेलकट पदार्थ टाळावेत
आंबट, तिखट, तेलकट पदार्थामुळे सर्दीसह घशाचे आजार बळावतात. असे आजार संसर्गजन्य असतात. पावासाळ्यात या आजारांचा प्रसार झपाट्याने वाढू शकतो. तळलेल्या पदार्थांमुळे घशासह पचनक्रियेच्या समस्या उद्भवण्याचा धोका असतो. त्यामुळे हंगामी फळांसह भाज्या, कडधान्य, भरडधान्याचा समावेश आरोग्यासाठी लाभदायक ठरतो.
भाजणीचे वडे आणि आळू खा
भाजणीच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा. चवीसाठी भाजणीचे वडे बनवून ते खाता येतील. आळूची भाजी पोटातील विषारी घटकांना मारक आहे. चांगल्या पद्धतीने आळूच्या भाजीचे सेवन करत राहिल्यास शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर सतत जात राहतील आणि प्रकृतीही चांगली राहण्यास मदत होईल, असेही भागवत यांनी सांगीतले.
सणातील 74 भाज्या आरोग्यदायी
तणवर्गीय, झुडूपवर्गीय, फळवर्गीय आणि वृक्षवर्गीय भाज्या आहेत. या भाज्या ऊन आणि थंडीचा बॅलन्स करतात. कुर्डूची भाजी खाल्ल्याने किडनी स्टोन पडतो. कुर्डूच्या बिया कोमट पाण्यातून घेतल्यास किडनी स्टोन पडतो. दुर्वा, आघाड्याचा रस पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते. गौरी (तेरडा) त्वचा विकार बरा करते. गुळवेलाचा रस पिल्याने अनेक आजार कमी होतात. म्हाळुंग लिंबूवर्णीय फळ असून ते रोगांवर उपचार म्हणून वापरले जाते. कोहळ्याची भाजी स्मरणशक्ती वाढवते. अशा प्रकारे सणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 74 भाज्या आरोग्यदायी आहेत.
श्रावणमास आणि पौरोहित्य दोहींचा संगम
"श्रावण मास म्हणजे वैज्ञानिक आणि पौराहित्य या दोन्हींचा संगम आहे. आहाराच्या दृष्टिकोनातून श्रावणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवसात हवामानात मोठे बदल होतात. श्रावणात सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे पचनशक्ती मंदावते. म्हणून या काळात मांसाहार टाळावा. या काळात फळाचे सेवन केले पाहिजे. यातून मिळणारी सत्वे ही जास्त असतात. त्यामुळे रक्त शुध्द होते. या काळात रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत. त्यामधील जीवनसत्वाचे पोषण शरीराला वर्षभर मिळत राहते. श्रावणात करण्यात येणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत. या संस्कृतीच्या जोडीला शास्त्राrय कारणे देखील आहेत. त्यामुळे अनुकरण केले पाहिजे."
- डॉ. श्रुती भोला
उपवासाला हवी सात्विक आहाराची जोड
"सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरीया, चिकनगुनियासारखे आजार डोके वर काढत आहेत. यावेळी शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी प्रथिनांची गरज असते. हंगामी फळांचा आहारात समावेश करावा. यामध्ये व्हिटॅमीन सी मात्रा भरपूर प्रमाणात असते. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पोटाच्या इन्फेक्शनचा धोका असतो. त्यामुळे उकळलेले पाणी पिणे योग्य ठरते. उपवास काळात विशेषत: महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजचे आहे. चहामध्ये खडा मसाला व आल्ले, हळदीचा समावेश करावा, त्यामुळे पचनशक्ती सुधारते. उपवासामध्ये सात्विक आहाराची जोड आवश्यक आहे."
- डॉ. प्रेरणा देवकाते, आहारतज्ञ, सीपीआर हॉस्पिटल
पालेभाज्यांचा वापर प्रसादामध्येही करावा
"श्रावणात भाज्यांना आरोग्यदृष्ट्या खूप महत्व आहे. पुजेसाठी वापरलेली पाने, फुले म्हणजे त्या आरोग्यदायी पालेभाज्या असतात. त्या खाण्यासाठी पोषक असतात. प्रसादामध्येही पालेभाज्यांचा समावेश करावा, जेणेकरून आरोग्य निरोगी राहील. पुर्वीपासून देवदेवतांना 120 भाज्यांचे नैवेद्य दाखवले जात होते. त्यावेळी पसरलेली रोगराई दूर करण्यासाठी भाज्या केल्या जात होत्या. निरोगी राहता यावे, म्हणून विविध भाज्या खाल्या जायच्या. आरोग्यदायी भाज्या खाण्यासाठी परिसरात परसबागेत किंवा पुंडीत भाज्यांची रोपे, वेल, औषधी वनस्पती लावल्यास त्याचा उपयोग शरीर निरोगी राहण्यास होईल. पुजेनंतर फूले पाण्यात न टाकता त्यापासून पावडर करावी, ती शरीराला लावली तरी त्वचारोगापासून मुक्तता होते."
- अनिल चौगुले, निसर्गमित्र संस्था
आहाराबाबत नव्या पिढीला माहिती देणे आवश्यक
"लहान मुलांना रानभाज्या किंवा श्रावणामध्ये खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांविषयी शास्त्रीयदृष्ट्या माहिती सांगणे गरजेचे आहे. तरच त्यांना श्रावणामध्ये घेतल्या जाणाऱ्या आहाराविषयी कळेल. मुले कोणताही आहार आवडीने खातात, पण त्यांना त्याबद्दल योग्य आणि शास्त्रशुद्ध माहिती दिली पाहिजे. मुळात श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये, याचे एक वैज्ञानिक कारण आहे. कारण या महिन्यामध्ये जलचर प्राणी, काही स्ततन प्राणी यांचा प्रजननाचा काळ असतो. त्यामुळे श्रावणामध्ये मांसाहार व्यर्ज्य केला जातो. हा शास्त्रीय दृष्टीकोन आजच्या तरूण पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. या काळामध्ये आपली पचन क्षमता मंद झालेली असते. त्यामुळे शरीरासाठी हलका आणि सात्विक आहार घेणे फार गरजेचे आहे."
- रेणु बोडके, गृहिणी, कोल्हापूर
पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारणे काळाची गरज
"आपण करत असलेल्या सणांचा मूळ हेतू धार्मिक असूनही पर्यावरण रक्षणाशीही जोडलेला होता. आता सणांचे स्वरूप बदलले आहे. श्रावण सोमवारला धार्मिक श्रद्धेपेक्षा साऊंड सिस्टीमला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे इतरांना त्रास सहन करावा लागतो. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे प्रदूषण वाढते. फटाक्याच्या धुरामुळे श्वसनाचे विकार निर्माण होतात. तापमानवाढ, जैवविविधतेची हानी आणि निसर्गाचे असंतुलन यासाठी हे कारणीभूत ठरत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी जागरूक होणे, सण साजरे करताना निसर्गाशी सुसंगत पद्धती स्वीकारणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे गरज बनली आहे."
- डॉ. प्रकाश राऊत, पर्यावरणतज्ञ
श्रावणातील सणांना धार्मिकतेची जोड
"श्रावणात वातावरणात आर्द्रता असल्याने पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. त्यामुळे मांसाहार टाळून शाकाहार करायचा असतो. म्हणूनच श्रावणातील सणांना धार्मिकतेची जोड दिली आहे. श्रावणात आर्द्रता असल्याने सूक्ष्म जीव-जंतू जनावरांच्या पोटात असतात. त्यामुळे शाकाहारी आहारात मुळा, दुधी, दोडका, पालेभाज्या जास्त प्रमाणात खाव्यात. यातून व्हिटॅमिन, आयर्न आणि शरीराला भरपूर पाणी मिळते. शेपूची भाजी आणि भाकरीतून ए, बी, सी व्हिटॅमिन, लोह मॅग्नेशिअम मिळते. म्हणून मुलांना सणांबरोबर भाज्यांचे महत्व समजून सांगितले पाहिजे. सणांच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या खेळातून महिला एकत्र येऊन ओळख होते. यातून सामाजिक सलोखा साधण्यास मदत होते. श्रावणातील सर्व सण धार्मिक, सामाजिक, आरोग्यदायी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे असतात, याची जाणीव नव्या पिढीला करून दिली पाहिजे."
- प्राची साळोखे, शिक्षक
चातुर्मासात सकस आहाराची रचना
"श्रावण मास आणि चार्तुमास हे दोन्ही माणसांच्या जीवनशैलीशी निगडीत आहेत. ते सण- वार हे शेतीवरही आधारीत आहेत. चांगल्या आणि सकस आहाराचीही जोड चार्तुमासाच्या कालावधीत दिली आहे. जेणे कऊन सकस आहारच घ्यावा. त्याला धार्मिक जोड असल्यानेही लोकही सकस आहार घेतात. महिलांना सामाजिक जीवनात वावरता यावे म्हणून व्रतवैकल्य, मंगळागौरी पूजनासारख्या धार्मिक कार्यांची मांडणी केली आहे. श्रावणातील मंगळागौरी मूर्तीला आणि गणेशोत्सवात गणेशमूर्तीला 18 ते 21 प्रकारच्या वनस्पती पत्री वाहिल्या जातात. महिलांनी या वनस्पती पत्रींचे औषधी गुणधर्म समजून घ्यावेत. महिलांनी वनस्पती पत्री घरी ठेवण्यावर भर द्यावा. त्याचे महत्व समजून घ्यावे."
- वेदमूर्ती अमोघ भागवत
शाश्वत विकासासाठी सणांचे महत्व
"भारतीय संस्कृतीत सण- उत्सवांना महत्व आहे. उत्सव, सणांमुळे शाश्वत विकास होण्यास मदत होते. तसेच प्रत्येक सणांमध्ये प्रत्येक पदार्थाचे महत्व आहे. आहारात पदार्थांचा अतिरेक होऊ नये. व्रतविधानात रानभाज्यांचे महत्व सांगितले असून ते समाजमूल्यांशी जोडले आहे. पण सर्वांकडून ओरबाडून व्रत करु नये. श्रावण महिना हा मनाचे आरोग्य जपणारा असून तोच शाश्वत विकास आहे. कर्मकांडात न अडकता वेगळ्या पैलूंनी सणांचा विचार झाला पाहिजे. श्रावणातील केलेली सण, उत्सवाची श्रृखंला प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. त्यानुसार या काळात आपला आहार आणि विहार ठेवला पाहिजे, उमलत्या पिढीत हे संस्कार रूजवले पाहिजेत."
-अॅड. प्रसन्न मालेकर