बोरीवडेत पाणी साठवण तलावाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन
अमृत सरोवर योजनेतून पन्हाळा तालुक्यात तीन तलाव : आ. कोरे
वारणानगर / प्रतिनिधी
बोरीवडे ता.पन्हाळा येथे अमृत सरोवर योजनेतून पाणी साठवण तलावाचे उद्घाटन शाहूवाडी - पन्हाळ्याचे आमदार डॉ.विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात देशाचे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समवेत मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या बैठकीत शाहूवाडी - पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील अमृत सरोवर योजनेअंतर्गत सरोवर निर्मितीसाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ रत्नागिरी ते नागपूर मध्ये समावेश करणेसाठी आमदार डॉ विनय कोरे यांनी प्रस्ताव सादर केला होता सदर बैठकीमधील निर्देशानुसार जिल्हा प्रशासन यांनी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग क्र. गौखनी- १०/१२२१/प्र.क्र.३२०/ख-२ दिनांक १४-०९-२०२२ अन्वये शाहूवाडी व पन्हाळा विधानसभा मतदार संघातील मौजे बोरिवडे, गिरोली व आवळी (ता.पन्हाळा) या गावांतील गायरान क्षेत्र व अस्तित्वातील तलावांमधील गौण खनिज काढणेबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागाकडून व त्यांच्या अभिकरणाकडून प्राप्त मागणीनुसार गौण खनिज उत्खननाचा प्रस्ताव सर्व यंत्रणांच्या नाहरकत प्रमाणपत्रासह कोल्हापूर जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांना सादर करणेत आला होता या प्रस्तावास जिल्हाधिकारी रेखावर मान्यता दिल्यावर या अमृत सरोवर योजनेच्या कामाचा आज शुभारंभ झाला.
अमृत सरोवर योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७५ तलावांच्या निर्मितीचे उदिष्ठ देणेत आले होते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ९२ अमृत सरोवरांची निर्मिती होवून २६५.३२ स. घ. मी. पाण्याचे संवर्धन करणेत आले आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील बोरीवडे,आवळी, गिरोली या पन्हाळा तालुक्यातील तीन तलावांमधील अंदाजीत ३ लक्ष घन मीटर उत्खनन करून ३०० स. घ. मी. पाणी साठवण्याचे उदिष्ट असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.
आ. कोरेंच्या पाठपुराव्यामुळे योजना मार्गी लागली : गडकरी
अमृत सरोवर ही योजना महाराष्ट्रात सर्वत्र लागू आहे पण म्हणावा तेवढा ह्या योजनेचा लाभ लोक घेत नाहीत. पण बोरिवडे, गिरोली व आवळी हे प्रकल्प पूर्ण होण्याचे कारण की ह्या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी व माझे मित्र आमदार डॉ.विनय कोरे यांनी सा
सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ह्या प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे यांचा आनंद मला होत असल्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रसंगी सांगितले.
उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी राहूल रेखावार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने,अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, कार्यकारी अभियंता जलसंधारण बाळासाहेब आजगेकर,विभागीय प्रमुख मुंबई अंशुमली श्रीवास्तव, शाहूवाडी-पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे,पन्हाळा तहसिलदार माधवी शिंदे-जाधव,गटविकास अधिकारी सोनाली माडकर, सेवानिवृत्त अधिकारी संभाजी माळी,पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर,बोरिवडेचे सरपंच आनंदा कदम यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,सर्व संस्थाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.