केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज निपाणीत
डॉ. प्रभाकर कोरे यांचा नागरी सत्कार
वार्ताहर/निपाणी
येथील श्रीपेवाडी रोडवर असणाऱ्या विद्यासंवर्धक मंडळाच्या सोमशेखर आर. कोठीवाले अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात डॉ. प्रभाकर कोरे यांचा नागरी सत्कार सोहळा व विद्यासंवर्धक मंडळ संचलित सोमशेखर आर. कोठीवाले अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या एमबीए आणि एमसीए महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ असा संयुक्त कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री प्रल्हाद जोशी हे असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी हे उपस्थित राहणार आहेत विद्या संवर्धक मंडळाच्या माध्यमातून चेअरमन सहकाररत्न चंद्रकांत कोठीवाले यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी सुसज्ज असा मंडप उभारण्यात आला आहे. आकर्षक सजावट केली गेली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अकोळ रोडवरील खुल्या जागेत हेलिपॅड निर्माण करण्यात आले आहे. सर्वपक्षीय नेते या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर येणार आहेत. यामुळे सत्कार सोहळा किंवा इमारत उद्घाटन व्यतिरिक्त आणि कोणते महत्त्वपूर्ण वक्तव्य सभेच्या माध्यमातून नेत्यांकडून होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्कारमूर्ती डॉ. प्रभाकर कोरे या सोहळ्याच्या माध्यमातून निपाणी परिसरासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करतील असेही बोलले जात आहे. शहरातील मुख्यमार्गासह कार्यक्रम स्थळाच्या मार्गावर सत्कारमूर्ती व आगमन होणारे मान्यवर नेते यांचे स्वागत करणारे डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी आकर्षक स्वागत कमानी देखील निर्माण केल्या गेल्या आहेत. या कार्यक्रमाला परिसरातून सुमारे 10 हजार पेक्षा अधिक नागरिक व महिला उपस्थित राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे. विद्यासंवर्धक मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावरच पार्किंगची सुविधा देखील केली गेली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने सुरक्षेसाठी आवश्यक तयारी केली असल्याचे सांगण्यात आले आहे.