विश्वेश कर्पे, लक्षी आमोणकर यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक
प्रतिनिधी/ पणजी
पर्वरी उपविभागीय अधिकारी विश्वेश कर्पे तसेच गुन्हा अन्वेषण विभागात कार्यरत असलेले लक्षी आमोणकर यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. दिल्लीत होणाऱ्या एका कार्यक्रमात हे पदक देण्यात येणार आहे. दोन्ही अधिकाऱ्यांचे पोलिस खात्यात तसेच त्यांच्या हितचिंतकाकडून अभिनंदन केले जात आहे.
विश्वेश कर्पे हे 1997 साली उपनिरीक्षक म्हणून पोलिस खात्यात भरती झाले होते. त्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारने त्यांना 2005 साली निरीक्षकपदी बढती दिली. पोलिस खात्याच्या विविध विभागात त्यांनी काम केले आहे. 2022 साली त्यांना उपअधीक्षकपदी बढती मिळाली. त्यानंतर त्यांच्या कार्याची विशेष दखल घेऊन 2023 साली त्यांना मुख्यमंत्री पदकाने गौरविण्यात आले. सध्या पोलिस उपअधीक्षक विश्वेश कर्पे हे पर्वरी उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
लक्षी आमोणकर हे 2001 साली पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले हेते. त्यानंतर 2006 साली ते उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. 6 सप्टेंबर 2006 रोजी ते उपनिरीक्षक म्हणून पोलिस खात्यात ऊजू झाले. विविध पोलिस स्थानकात काम करताना त्यांनी आपल्या कामाची चुणकता दाखविली आणि वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर 2020 साली त्यांना निरीक्षकपदी बढती लाभली. त्यांनी केलेल्या अद्वितीय कामाची दखल घेत लक्षी आमोणकर यांना 2021 साली डीजीपी पदकाने गौरविण्यात आले. सध्या लक्षी आमोणकर हे गुन्हा अन्वेषण विभागात कार्यरत आहेत.