युनियन जिमखाना, बेळगाव स्पोर्ट्स क्लब विजयी
बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित बालाजी चषक 13 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत युनियन जिमखाना संघाने प्रमोद पालेकर अ संघाचा 226 धावांनी तर बेळगाव स्पोर्ट्स क्लबने साई स्पोर्ट्सचा 10 गड्यांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. साईराज, मोहम्मद हमजा व अलतमश यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. प्लॅटिनम ज्युब्ली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात युनियन जिमखानाने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 5 गडी बाद 280 धावा केल्या. त्यात साईराज पोरवालने 16 चौकारासह 103 तर मोहम्मद हमजाने 1 षटकार 14 चौकारासह 100 धावा करुन दमदार शतके झळकविली. कृष्णा पाटीलने 21 धावांचे योगदान देवून सुरेख साथ दिली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रमोद पालेकर अकादमीचा डाव 54 धावांत आटोपला. त्यात हर्षित हेमंत व शिव सुंदर देसाई यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. जिमखानातर्फे प्रेम डी.ने 8 धावांत 3, सलमान व गौरव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात साई स्पोर्ट्सने 14 षटकात सर्वगडी बाद 70 धावा केल्या. त्यात जीर जकनूरने 11, सुरेश पाटीलने 10 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे अलतमश व सोहम एम. यांनी प्रत्येकी 2 तर समर्थ व साईने प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्सने 12 षटकात बिनबाद 71 धावा करुन सामना10 गड्यांनी जिंकला. त्यात अलतमश एस. व दिगंनाथ वाली यांनी प्रत्येकी 29 धावा केल्या.