शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश-पापुस्तके
शालेय शिक्षण विभागाकडून वितरण : शिक्षकांकडून प्रारंभोत्सवाची जय्यत तयारी सुरू
बेळगाव : नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 ला लवकरच प्रारंभ होणार आहे. सरकारीसह अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये प्रारंभोत्सव करण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तके दिली जाणार आहेत. तसेच लवकरात लवकर शालेय गणवेश देण्यात यावा, यासाठी बेळगाव जिल्हा शिक्षण कार्यालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षी शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी पाठ्यापुस्तकांचे वितरण झाले नव्हते. तर सहा महिन्यांनी गणवेश हाती मिळाले होते. यामुळे विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशांवर शिक्षण घ्यावे लागत होते. यासाठी यावर्षी वेळेत पाठ्यापुस्तके व गणवेश देण्यासाठी सार्वजनिक शिक्षण विभाग तयारी करीत आहे. शाळा सुरू होण्यास अवघा आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने शिक्षकांकडून स्वागतोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
संपूर्ण जिल्ह्यात पाठ्यापुस्तके आणि गणवेशांचा साठा आधीच करण्यात आला आहे. त्याचे वितरण सध्या विभागवार केले जात आहे. 29 मेपासून शाळा सुरू होणार असून 1 जूनपासून विद्यार्थी शाळेमध्ये दाखल होणार आहेत. पहिल्याच दिवशी जिल्ह्यात 100 टक्के पाठ्यापुस्तके आणि गणवेश पुरविण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात सरकारी शाळांसाठी 30 लाख 18 हजार 662 पुस्तकांची मागणी आहे. त्यापैकी आतापर्यंत 17 लाख 75 हजार 59 पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. अंदाजे 12 लाख पुस्तके येणे अद्याप बाकी आहे. खासगी शाळांमध्ये 9 लाख 97 हजार 889 पुस्तकांची मागणी असून त्यापैकी 6 लाख 65 हजार 186 पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. सरकारी तसेच खासगी शाळांमधील शिक्षकांनी आपापल्या शाळांमध्ये पुस्तके जमा करून ठेवली आहेत. पहिल्या दिवशी ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत.